गोव्यात पर्यटकांची काळजी सुरक्षा दल घेणार- मुख्यमंत्री
By admin | Published: August 16, 2016 08:23 PM2016-08-16T20:23:40+5:302016-08-16T20:23:40+5:30
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पर्यटक सुरक्षा दल करणार आहे
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - गोव्यातील किनारपट्टीवर तसेच अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पर्यटक सुरक्षा दल करणार आहे. किनारपट्टीवर काही बेकायदा व गैर घडू नये म्हणूनही काळजी घेण्याचे काम हा दल करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.
गोव्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. शनिवारपासून सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्यानेही मोठय़ा संख्येने पर्यटक गोव्यात आले होते. जरा सुट्टी मिळाली की पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतात. यामुळेच हॉटेलांच्या खोल्यांचे भाडेदरही वाढले आहेत. भाजपचेच एक आमदार मायकल लोबो यांचे हॉटेल असून त्यांच्या खोलीचे भाडे पावसाळ्य़ात प्रति दिन दोन हजार रुपये असते पण यावेळी ते पंधरा हजार रुपये झाले, असे उदाहरणही मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिले.
मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटक सुरक्षा दलाची स्थापना यापूर्वी झाली असून या दलात पन्नास पदे भरली जाणार आहेत. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुर केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. 33 माजी सैनिक, 19 चालक, 4 कारकून, 6 तालुका सुपरवायझर, 1 मुख्य पर्यटक सुरक्षा रक्षक यांची भरती दलामध्ये केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, गोमेकॉसह सरकारी इस्पितळांमधील नॉन- टिचिंग डॉक्टरांच्या निवृत्ती वयात सरकारने 6क् वरून 62 र्पयत दोन वर्षाची वाढ केली. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी गोमेकॉतील टिचिंग विभागातील डॉक्टरांच्या निवृत्ती वयात साठवरून पासष्ट वयार्पयत पाच वर्षाची वाढ करण्यात आली. आता नॉन टिचिंग डॉक्टरांच्या निवृत्ती वयात वाढ झाल्याचा लाभ सुमारे शंभर डॉक्टरांना मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पाच सरकारी तंत्रनिकेतन संस्थांमध्ये (पॉलिटेक्नीक) एकूण 46 व्याख्यात्यांची कंत्रट पद्धतीवर नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.यापूर्वी मुलाखती घेऊन व्याख्यात्यांची निवडही करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आता कंत्रट पद्धतीवर केली जाईल. अनुभवानुसार वेतन मिळेल. किमान तिस हजार व कमाल अडतीस हजार रुपयांचे वेतन निश्चित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सहकार खात्यात ऑडिट सहाय्यकांच्या बारा जागा यापूर्वी रद्दबातल ठरल्या होत्या. त्या पुनरुज्जीवीत करण्यात आल्या आहेत. सहकार खात्याची पाच विभागीय कार्यालये आहेत. आता सहावे कार्यालय डिचोलीत साकारले आहे. या कार्यालयासाठी पंधरा नवी पदे मंत्रिमंडळाने निर्माण केली. त्यात एक सहाय्यक निबंधक, दोन वरिष्ठ ऑडिटर्स, तीन कनिष्ठ ऑडिटर्स, दोन कारकून, दोन प्यून आदी पदांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.