'ताळगाव'ची निवडणूक जाहीर; २८ एप्रिल रोजी पंचायतीसाठी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 06:53 AM2024-03-29T06:53:34+5:302024-03-29T06:53:56+5:30
महिलांसाठी चार प्रभाग राखीव, पाच प्रभाग अनुसूचित जमातीसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वेध सुरू असताना पंचायत खात्यातर्फे ताळगाव पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. २८ एप्रिल रोजी ताळगाव पंचायतीची निवडणूक होणार आहे.
पंचायत क्षेत्रात एकूण अकरा प्रभाग असून, यातील चार प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर पाच अनुसूचित जमातींसाठी व एक ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या चार जागांमध्ये प्रभाग क्र. ३, ४, ६, ९ यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा पंचायतीमधील महिला सदस्यांची संख्या वाढेल हे निश्चित. पंचायतीची कारकीर्द ९ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. ९ मे २०२४ पर्यंत नवीन पंचायत कमिटी स्थापित होणे गरजेचे होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वीच ताळगाव पंचायतीच्या निवडणुका ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगानेदेखील या पंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ताळगाव पंचायत वॉर्डाची निवडणुकीच्या दृष्टीने पुनर्रचना केली होती. त्याचा मसुदा तिसवाडी तालुका मामलेदार कार्यालयात तसेच ताळगाव पंचायतीत जनतेसाठी खुला केला होता. ९ मार्चपर्यंत तो मसुदा जनतेसाठी खुला होता. दरम्यान, मतदारांनी आक्षेप, सूचना यावेळी नोंदवल्या होत्या. पंयातीचे सुमारे ३० हजार मतदार आहेत.
समीकरण बदलणार
आतापर्यंत केवळ पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे पंचायतीवर वर्चस्व राहिले आहे. मोन्सेरात कुटुंबीयांचा पंचायतीवर बोलबाला राहिला असून यंदाही तशीच स्थिती राहील, पण, यंदा महिलांसाठी चार प्रभाग व अनुसूचित जमातीसाठी पाच प्रभाग राखीव ठेवण्यात आल्याने समीकरणे बदलतील. तसेच जुने चेहरे पुन्हा दिसण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.