तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:39 PM2019-03-18T14:39:42+5:302019-03-18T14:41:01+5:30

राजकारणात यशस्वी होऊन मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेण्यास कधी संकोच बाळगला नाही. उलट संघाच्या संस्कारांमुळेच आपल्याला सामाजिक दृष्टी मिळाल्याचेही ते अनेकदा सांगत होते.

taluka sangh chalak to cm of goa manohar parrikars journey | तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास

तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास

googlenewsNext

-वासुदेव पागी

'ते बालस्वयंसेवक आहेत,’ अशा शब्दांत एखाद्या ज्येष्ठ कार्यकर्त्याची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघात करून दिली तर त्याचा अर्थ होतो, ते बालपणापासूनचे आतापर्यंत स्वयंसेवक आहेत. मनोहर पर्रीकर हे तसे बालस्वयंसेवकच होते. ज्या दिवशी म्हापसा शाखेवर भगव्या ध्वजासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना म्हटली त्याच दिवसापासून ते संघाचे घटक बनले. म्हापसा शाखेचे स्वयंसेवक, गटनायक, मुख्य शिक्षक, शाखा कार्यवाह अशी एक-एक जबाबदारी घेत ते एक दिवस बार्देस तालुक्याचे संघचालक बनले. १९८९ साली भाजपची गोव्यात स्थापना होईपर्यंत ते बार्देस तालुक्याचे संघचालक होते. शहराचे कार्यवाह होते.

गोव्यात सुभाष वेलिंगकर यांच्यासारख्या फार जुन्या स्वयंसेवकांची फळी आहे तर त्यानंतरच्या काही दहा वर्षांतील स्वयंसेवकांचीही फळी आहे. त्या दुसऱ्या फळीतील पर्रीकर स्वयंसेवक होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, संजीव देसाई, माधव धोंड हे तसे संघकामात बरोबरचे होते. त्या सर्वच्या सर्व नेत्यांनी गोव्यात भाजपची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला तेव्हाच पर्रीकर यांचाही राजकीय प्रवास सुरू झाला. श्रीपाद नाईक हे भाजपसाठी देण्यात आलेले गोव्यातील पहिले स्वयंसेवक तर पर्रीकर दुसरे.

रामजन्मभूमीसाठी जे मोठे आंदोलन झाले होते त्यात पर्रीकर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. १९९० साली गोव्याहून अयोध्येला निघालेल्या दक्षिण गोव्यातील कारसेवकांच्या तुकडीचे नेतृत्व श्रीपाद नाईक यांनी केले होते तर उत्तर गोव्यातील कारसेवकांच्या तुकडीचे नेतृत्व मनोहर पर्रीकर यांनी केले होते. झांसी येथे गोव्यातील स्वयंसेवकांना अटक करण्यात आल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नव्हते; परंतु पोलिसांकडून गोळीबार होत असतानाही त्यांच्याबरोबर असलेल्या कारसेवकांची जबाबदारी घेताना त्यांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय होती.

संघटन कौशल्य, काम करण्याची चिकाटी आणि समर्पित वृत्ती पर्रीकर यांनी संघात दाखविली आणि संघाच्या कामाचा बार्देसमध्ये विस्तार केला तीच गुणवत्ता त्यांनी भाजपातही दाखविली. त्यांच्या गुणकौशल्यांचे कौतुक करताना गोव्याचे पूर्वीचे संघचालक सुभाष वेलिंगकर अनेकवेळा म्हणायचे की, ‘मनोहरला नेता बनविण्यासाठी संघाला एक रुपयाही खर्च करावा लागला नाही.’ नेतृत्वगुण त्यांच्या अंगातच होते. मुख्यमंत्री बनल्यानंतर अनेकवेळा त्यांना लोकांच्या गर्दीत शिरण्याचे धाडस दाखविताना लोकांनी पाहिले आहे, तसेच संघात काम करतानाही अनेकवेळा जमावात शिरण्याचे धाडसही त्यांनी दाखविले आहे.

राजकारणात यशस्वी होऊन मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेण्यास कधी संकोच बाळगला नाही. उलट संघाच्या संस्कारांमुळेच आपल्याला सामाजिक दृष्टी मिळाल्याचेही ते अनेकदा सांगत होते. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा संघाच्या विजया दशमीच्या संचलन कार्यक्रमात ते संघाचा अर्धी पॅँट व पांढरे शर्ट, पट्टा, टोपी अशा तेव्हाच्या पूर्ण गणवेशात उपस्थित राहिले होते. या कारणावरून त्यांच्यावर डाव्या विचारसरणीवाल्यांकडून जोरदार टीकाही करण्यात आली होती आणि माफी मागण्याचीही मागणी केली होती; परंतु पर्रीकर यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट अलीकडेच पणजी येथे झालेल्या संघाच्या कार्यक्रमातही संघाच्या नवीन गणवेशात ते पुन्हा हजर राहिले होते.

Web Title: taluka sangh chalak to cm of goa manohar parrikars journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.