विश्वसंचारासाठी ‘तारिणी’ सज्ज
By admin | Published: January 30, 2017 08:47 PM2017-01-30T20:47:30+5:302017-01-30T20:47:30+5:30
भारतीय नौदलाचे ५६ फुटी असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे.
सचिन कोरडे -
पणजी. दि. 30 : भारतीय नौदलाचे ५६ फुटी असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याच्या मोहिमेवर निघेल. उल्लेखनीय म्हणजे, या जहाजाची धुरा नौदलातील सहा महिलांकडे असेल. सर्व महिलांना कॅप्टन दिलीप दोंदे यांनी प्रशिक्षित केले असून भारतीय नौदलासाठी ही मोहीम प्रेरणादायी मानली जात आहे. कॅप्टन वर्तिका जोशी यांच्याकडे महिला टीमचे नेतृत्व आहे.
सध्या पणजी येथील कॅप्टन आॅफ पोटर््स येथे हे प्रशिक्षण जहाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आयएनएसव्ही तारिणी’बाबत नौदलाचे निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे म्हणाले की, विश्वसंचारासाठी निघालेले हे दुसरे जहाज आहे. यापूर्वी आयएनएस म्हादईने अशी मोहीम पूर्ण केली होती. त्यातही महिलांची टीम होती. नौदलातील हे एक प्रतिष्ठेचे जहाज आहे. दक्षिण भागात प्रवास करताना सर्वाधिक अडथळे असतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हादईप्रमाणेच ‘तारिणी’सुद्धा सक्षम आहे. दक्षिण भागात, विशेषत : न्यूझीलंड सागरात लाटा आणि वारा प्रतिकूल असतात. वाऱ्याचा वेग ताशी १४५ नॉट्स तर लाटा २० फुटांपर्यंत असतात. अशा स्थितीत सफर करणे खूप आव्हानात्मक असते. त्यासाठी ‘तारिणी’ ही तारणारी ठरते. नौदलातील प्रक्षिणार्थ्यांना हे जहाज खूप फायदेशीर ठरेल. याचा उपयोग व्यावसायिक जरी नसला तरी ते भारताचे अॅम्बेसेडर म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी सांगितले
तारिणीचे रचनाकार
ऐतिहासिक वेळेत या जहाजाची बांधणी करण्यात आली. म्हादईनंतर तारिणीचे बांधणीचे काम अॅक्वेरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घेतले. वेळ आणि खर्च या दोघांचाही समतोल साधत त्यांनी ११ महिन्यांत जहाजाची बांधणी केली. म्हादईचीच प्रतिकृती असलेले हे जहाज ३० जानेवारी २०१७ ला चाचणीसाठी सज्ज झाले. तारिणीचे रचनाकार असलेले रत्नाकार दांडेकर म्हणाले, की निर्धारित वेळेपेक्षा कमी आणि बजेट लक्षात घेता तारिणीची बांधणी करणे आव्हानात्मक होते. असे असतानाही आम्ही ऐतिहासिक वेळेत ती नौदलाच्या सेवेत आणली. यासाठी ४ कोटींचा खर्च आला असून म्हादईच्या तुलनेत यात काही किरकोळ बदल करण्यात आले. जहाजासाठी लागणारे बरेचसे साहित्य हे देशातील आहे. मात्र, बांधणी विदेशी आहे. यामध्ये अॅल्युमिनियम व्हेसल्स, स्टिल व्हेसल्स, फास्ट रेस्क्यू क्राफ्टचा वापर करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, इलेक्ट्रॉनिक नेव्हीगेटर, जीपीएस, डिजिटल मीटर आणि जहाजातील इन्टेरियरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.
म्हादईचा २ लाख किमीचा प्रवास
भारतीय नौदलाचे पहिले ५६ फुटी प्रशिक्षण जहाज असलेल्या ‘म्हादई’ने गेल्या आठ वर्षांत २ लाख किलोमीटरचा प्रवास केला होता. ते १२ फेब्रुवारी २००९ रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाले होते. २००९-१० मध्ये कॅप्टन दिलीप दोंदे याच्याकडेच या मोहिमेचे नेतृत्व होते. म्हादईने दोनदा एकल पृथ्वी प्रदक्षिणा, मॉरिशस मोहीम, तीन वेळा रिओ रेसमध्ये सहभाग, आग्नेय आशिया मोहीम यशस्वी केली होती.
१) भारतीय नौदलात समाविष्ठ झालेल्या ‘तारिणी’नीची चाचणी करण्यात आली. अथांग सागरात सफर करताना ‘तारिणी’.
२) पणजी येथे कॅप्टन आॅफ पोर्ट येथे आयएनएस तारिणी’समवेत अॅक्वेरयिस शिपयार्डचे व्यवस्थापक संचालक रत्नाकर दांडेकर, कॅप्टन दिलीप दोंदे, महिला टीमचीप्रमुख कॅप्टन वर्तिका जोशी आणि कॅप्टन विजयादेवी.