पावसातही आंब्याची चव कायम; नीलम व मल्लिका आंब्यांची बाजारपेठेत विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:35 PM2023-07-24T14:35:52+5:302023-07-24T14:36:57+5:30
गोव्यात परराज्यातील आंब्यांना अजूनही मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा/मडगाव : राज्यात आंब्यांचा हंगाम जूनपासून संपला असला तरी आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून येणारे नीलम व मल्लिका आंबे येथील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी आंबे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वेंगुर्ला, देवगडमधील प्रसिद्ध हापूस आंबा विक्रीसाठी मुंबईला जातो, ते आंबे राज्यात फार कमी प्रमाणात येतात, अशी माहिती मडगावातील घाऊक आंब्यांचे व्यापारी आनंद नाईक यांनी दिली. येथील बाजारात नीलम आंबा आकारानुसार २०० ते ३०० रुपये प्रति डझन, मल्लिका आंबे १५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहेत. मल्लिका आंबा जास्त विकला जातो. तोतापुरी आंबाही विक्रीसाठी उपलब्ध आहे. गांधी मार्केटमधील घाऊक आंब्याचे व्यापारी अहमद खान यांनी नीलम आंबा आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात येत असून तो १०० रुपये प्रति किलो दराने विकला जातो, असे सांगितले.
सध्या आंब्याचा मोसम संपला असला तरी गोवेकरांना शेजारील राज्यातून आयात केलेला आंबा खायला मिळतोय. आंबा हे फळ सर्वांच्या ओळखीचे व आवडीचे असल्यामुळे आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक आंब्याच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात. सध्या राज्यातील आंब्याचा हंगाम उलटून गेला आहे, तरीही बाजारपेठेमध्ये शेजारील राज्यातून येणारे आंबे उपलब्ध होत आहेत.
आवडता आंबा म्हणजे मानकुराद. मसुराद, मालगेस, पायरी हे आंबेही आहेत. बहुतेक लोकांचा मानकुराद हा जास्त आवडीचा आंबा असल्यामुळे महाग असूनही खरेदी करतात. सध्या गोव्यातील आंब्याचा हंगाम उलटून गेलेला आहे. तरीही गोव्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये काही विक्रेत्यांकडे नीलम, तोतापुरी, बदामी या जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये तोतापुरी आंबा १२० रुपये प्रति किलो तर नीलम १०० ते १२० रुपये प्रति किलो व बदामी हा आंबा अन्य आंब्याच्या तुलनेत गोड असल्यामुळे थोडा महागात असून १५० रुपये प्रति किलो अशा दराने उपलब्ध आहेत.
हे आंबे कोल्हापूर व कर्नाटक येथून विक्रीसाठी उपलब्ध होतात.या आंब्याची विक्री काही प्रमाणात स्थानिक विक्रेते तर बिगर गोमंतकीय मोठ्या प्रमाणात करतात. अनेक विक्रेते कच्चे आंबे आणून नैसर्गिक पद्धतीने ते पिकवतात तर काही जण रसायनाचा वापर करून ते पिकवतात.
...मानकुरादला गोवेकरांचा प्रतिसाद
गोवेकरांच्या आवडीचा आंबा म्हणजे मानकुराद. त्यासाठी गोवेकर कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. राज्यात आंब्यांचा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरपासून सुरु होतो. यावर्षी आंब्याची आवक कमी होती. त्यामुळे दर काहीसा जास्त होता, तरीही अनेक गोवेकरांनी मानकुराद आंबा खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. यंदा राज्यात कर्नाटकमधील आंबा विक्रीसाठी राज्यात आला होता.
तोतापुरी आंबा पावसाळ्यामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे या आंब्याला विशेषतः कच्च्या आंब्याला जास्त मागणी असते. बदामी आंबा हा चवीला गोड असल्यामुळे त्यालाही मागणी आहे. नीलम आंबा हा बहुतेक कोल्हापूर येथून दाखल होतो पावसाळ्यात गोव्यातील आंबे संपलेले असल्यामुळे काही लोकांकडून खरेदी केली जाते. -अनिल काझीर, आंबा विक्रेता फोंडा.