सरकारच्या ठाम भूमिकेनंतर गोव्यातील टॅक्सीवाल्यांची नरमाईची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:37 PM2019-08-01T18:37:49+5:302019-08-01T18:41:40+5:30
संघटनेच्या निर्णयावरच सर्व काही अवलंबून
मडगाव: गोवा माइल्स अॅपबाबत सरकारने ठाम भूमिका घेतल्याने आतार्पयत या अॅपला विरोध करणारे व गोवा माइल्सला वेठीस धरणाऱ्या टॅक्सीवाल्याने नरमाईची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र टॅक्सी संघटना काय निर्णय घेते त्यावर सर्व काही अवंलबून आहे. अॅपला विरोध करीत पूर्वीच्याच पद्धतीने वाहतूक सेवा सुरु केली, तर त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होणार हे निश्चित आहे. टॅक्सीवाल्यांनाही आता त्याची जाणीव होऊ लागली आहे. मात्र संघटनेशी बांधील असल्याने एकतर्फी निर्णय घेता येत नाही अशी त्यांची स्थिती आहे. काहीजण खाजगीत तसे बोलूनही दाखवू लागले आहेत.
गोवा माइल्स टॅक्सीवाल्यांना वेठीस धरण्याचे प्रकार राज्यातील दक्षिण गोव्यातील सासष्टीतील किनारपट्टीभागातील कोलवा, वार्का तसेच मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरही घडलेले आहेत. या भागातील राजकारण्यांचा या टॅक्सीवाल्यांना पाठिंबा असल्याने गोवा माइल्स अॅपला माघार घ्यावी लागेल अशी खात्री या टॅक्सीवाल्यांना होती. मात्र परवा विधानसभेत अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी ठाम भूमिका घेताना अॅप आधारीत टॅक्सीच राज्यात धावेल असे ठासून सांगितले. टॅक्सीवाल्यांनी तीन महिने अनुभव घ्यावा. जर समाधान झाले नसेल तर स्वतंत्रपणो अॅप तयार करावे असेही सूचविले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतल्याने तसेच लोकांचीही टॅक्सीवाल्यांना सहानभुती नसल्याने आता या टॅक्सीवाल्यांची पायाखालील वाळू सरकू लागली आहे. लवकरच काहीतरी स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक आहे या मतापर्यंत हे टॅक्सीवाले येऊन पोहोचले आहेत.
दक्षिणेत विशेषत: किनारपटटी भागात टॅक्सीवाल्यांची मुजोरी वाढली होती. उत्तर गोव्यातील टॅक्सीवाल्यांनाही येथील टॅक्सीवाले आपल्या भागात येण्यास मज्जाव करत होते. अनेकदा ते हातघाईवर आल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अशा प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. सरकार आता अॅपसंबंधी ठाम असल्याने यापुढे आपली डाळ शिजणे कठीण आहे हे एव्हाना या टॅक्सीवाल्यांनाही कळून चुकले आहे.
अजूनही आम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलो नाही. लवकरच संघटनेची बैठक होईल, त्यात निर्णय होईल अशी माहिती टुरिस्ट टॅक्सी असोसिएशन गोवाचे उपसरचिटणीस फुर्कन शहा यांनी दिली. काही टॅक्सीवाल्यांशी चर्चा केली असता, आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर बोलताना आता सरकारने कडक भूमिका घेतल्याने काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय तरणोपाय नसल्याचे सांगण्यात आले. एकतर गोवा माइल्स सेवेकडे वळावे वा स्वत: अॅप सेवा सुरु करावी. यातील दुसरा पर्याय चांगला आहे असेही अनेकांनी बोलून दाखवले.