पार्किंग शुल्क न देणाऱ्या टॅक्सी चालकास बदडले, कोकण रेल्वे स्थानकावरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 04:46 PM2023-12-04T16:46:15+5:302023-12-04T16:47:33+5:30
या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. तसेच या वादावादीत तेथील प्रवेशद्वाराचीही मोडतोड केल्याने त्याचीही तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मडगाव (तुकाराम गोवेकर) : येथील कोकण रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या पे पार्किंगला वादाचे ग्रहण लागले आहे. वाहने पार्क करणाऱ्यांकडून शुल्क वसूल करणाऱ्या कार्मचाऱ्यांची दमदाटी सुरू असून आज, एका टॅक्सी चालकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. तसेच या वादावादीत तेथील प्रवेशद्वाराचीही मोडतोड केल्याने त्याचीही तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आज, सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हाणामारीची ही घटना घडली. पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या एका कर्मचाऱ्याबरोबर टॅक्सी चालक शफी मुल्ला यांचा वाद झाला. आपण जास्त वेळ थांबलो नाही, त्यामुळे आपल्याला एवढे प्रवेश शुल्क का आकारण्यात आले? असा प्रश्न त्यांनी संबंधितास विचारला. त्यावर शुल्क वसूल करणाऱ्याने आपल्याला पैसे दिल्याशिवाय जाता येणार नाही, असे सांगत त्यांची अडवणूक केली. यावेळी दोघांमध्ये वाद वाढत गेला असता शुल्क वसूल करणाऱ्यांनी टॅक्सी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी टॅक्सी चालकास पार्किंगचे पैसे मागितले असता त्याने आपल्याला अपशब्द वापरले तसेच शिव्याही दिल्या. याबाबत त्यांना जाब विचारताना मारहाणीचा प्रकार घडला. घटनेनंतर सतंप्त टॅक्सी चालकांनी रेल्वे स्थानकावरील प्रवेशद्वाराची मोडतोड केली. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जमावाला शांत केले मारहाण करणाऱ्यांना कोकण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली.
शुल्क आकारणी पूर्वीप्रमाणेच करा
यावेळी मडगाव पोलिस स्थानकाच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमी चालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. स्थानिक टॅक्सी चालक संतोष मालभाटकर तसेच त्यांच्या सहकारी टॅक्सी चालकांनी प्रवेश शुल्कास विरोध करत पूर्वी प्रमाणेच शुल्क वसूल सेवा सुरू करण्याची मागणी केली. काँग्रेसचे नेते सावियो कुतिन्हो यांनीही प्रवेश शुल्क वसुलीला विरोध केला आहे.