कडक शिस्त! शिक्षिकेनेच कापले विद्यार्थ्यांचे केस!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 06:09 PM2019-08-01T18:09:57+5:302019-08-01T18:10:43+5:30
गोव्यातील प्रकार : वारंवार सूचना देऊनही न ऐकल्याने घेतली टोकाची भूमिका
पणजी : विद्यार्थ्यांना शिस्त लावणे हे शिक्षकाचे काम असले, तरी शिस्तीच्या नावाखाली शिक्षकाने विद्यार्थ्यांचे केस स्वत:च कापले तर? पण हे खरं आहे. गोव्यात असा प्रसंग घडला आहे.
काही शिक्षक शिस्तीच्या नावावर शैक्षणिक नियमावलीचा भंग करतात. हा प्रकार मंगळवारी उत्तर गोव्यातील होंडा-सत्तरी येथील महावीर सरकारी हायस्कूलमध्ये उघडकीस आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे केस कापणारी ही महिला शिक्षक आहे. कीर्तीमाला गावडे असे या शिक्षिकेचे नाव आहे.
दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना वाढलेले केस कापण्यास या शिक्षिकेने बजावले होते, तरीही ते विद्यार्थी केस न कापताच आल्याने गावडे यांनी स्वत: कात्री अणून या विद्यार्थ्यांचे वाढलेले कसे कापले. हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर मंगळवारी पालकांनी विद्यालयात धाव घेत मुख्याध्यापिका शीतल कदम यांना जाब विचारला.
मुख्याध्यापिका कदम यांनी याबाबत शिक्षिकेला नोटीस बजावली जाईल, असे सांगितले. या वेळी त्या शिक्षिकेने हा शिस्तीचा भाग असल्याचे सांगितले.