शिक्षक, तुम्ही सुद्धा? विद्यादान पवित्र, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 08:29 AM2023-09-04T08:29:03+5:302023-09-04T08:30:09+5:30
शिक्षक दिन जवळ येत असतानाच काही शिक्षकांनी मात्र कुकर्म करून या पवित्र कार्यास गालबोट लावले आहे.
विद्यादान पवित्र असते. अनेक शिक्षक घाम गाळून पिढ्या घडवत आले आहेत. कोवळ्या वयात मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकच करत असतात. पूर्वी रामायण-महाभारतातील कथा सांगून मुलांच्या जीवनाला आकार दिला जात असे. साने गुरुजींच्या कथा ऐकताना मुलांचे डोळे भरून यायचे. अजूनही विविध शाळा व हायस्कूलमध्ये ही स्थिती आहे. अशा ठिकाणीच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. अशा शिक्षकांना आमचा सलाम. उद्या मंगळवारी ५ रोजी गोव्यातही शिक्षक दिन साजरा होणार आहे. शिक्षक दिन जवळ येत असतानाच काही शिक्षकांनी मात्र कुकर्म करून या पवित्र कार्यास गालबोट लावले आहे.
गोवा विद्यापीठाच्या एका साहाय्यक प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप झाला. पोलिस चौकशी सुरू झाली आहे. सत्य काय ते कळून येईलच; मात्र दोन विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचा आरोप केल्याने तो साहाय्यक प्राध्यापक निश्चितच आरोपीच्या पिंजऱ्यात पोहोचला आहे. महाविद्यालये किंवा विद्यापीठ स्तरावर काहीजण गैरवर्तन करतात हे कधीच लपून राहिलेले नाही. आयुष्यभर चांगली सेवा बजावल्यानंतर उतारवयात काहीजणांना दुर्बुद्धी सुचते. विद्यार्थिनी किंवा शिक्षिकांशी नीट वागण्याचे सौजन्य नाही त्यांनी विद्यादानाच्या क्षेत्रातून हद्दपार होणे समाजासाठी अधिक उपयुक्त ठरेल.
गोव्याचे समाजमन गेल्या काही दिवसांत सुन्न झालेले आहे. दोन हायस्कूलमध्येही विनयभंगाचे गुन्हे घडले. शिक्षकांनीच दोन-तीन विद्यार्थिनींचे विनयभंग केले, पीटी शिक्षकावर आरोप झाला आहे. कुंकळ्ळी व मडकई परिसरात लोक संतप्त झाले आहेत. एक-दोन ठिकाणी पालकांनी विद्यालयावर मोर्चाही नेला. शिक्षकाला केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्याला सेवेतून बडतर्फच करा अशी मागणी पालकांनी लावून धरली. ग्रामीण भागात काहीवेळा काही शिक्षकांचे गैरवर्तन लपून राहते. काहीजण राजकीय वशिलेबाजी व बळाचा वापर करतात. त्यामुळे पालक किंवा विद्यार्थी तक्रार करायला पुढे येत नाहीत; मात्र दोन प्रकार अलीकडे उघड झाले. लोकांनाही धक्का बसला आहे. शिक्षक लैंगिक शोषण करू पाहतो तेव्हा कोवळ्या वयातील विद्यार्थिनी घाबरतात. एखादी तर शाळाच कायमची सोडते. मुलींवर शाळा सोडण्यासारखी वेळ येते तेव्हा त्या शिक्षकाला कुणीच माफ करू नये. शिक्षण क्षेत्रातून अशा शिक्षकाला हद्दपार करण्याचीच गरज आहे.
पोलिस खात्यात किंवा शिक्षक म्हणून विद्यालयांमध्ये भरती करतानाची प्रक्रियाच आता बदलावी लागेल. पोलिस खात्यात भरतीवेळी उमेदवाराचे चारित्र्य तपासून पाहण्याची गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले युवक पोलिस खात्यात काहीवेळा भरती केले जातात. हेच युवक मग चोरट्यांशीही सेटिंग करण्यासारखे गुन्हे करतात. दक्षिण गोव्यात नको, उत्तर गोव्यात जाऊन चोरी कर असा चोरालाच एक पोलिस सल्ला देत असल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. डीआयजीनेदेखील गोव्यात क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन केले व मार खाल्ल्याचे प्रकरण नुकतेच गाजले. डीआयजी सेवेतून निलंबित झाला. एक-दोन शिक्षकही आता सेवेतून निलंबित झाले आहेत. पोलिस व शिक्षक माथेफिरूसारखे वागू लागतात तेव्हा समाजाने कुणाच्या तोंडाकडे पाहावे?
अगदी चौथीच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करण्याचे कुकर्म गोव्यात आठ वर्षांपूर्वी झाले होते. दक्षिण गोव्यातील विद्यालयात तसा गुन्हा घडला होता. प्राथमिक शाळेतील किंवा हायस्कूलमधील मुलींशी गैरवर्तन करणारी व्यक्ती शिक्षक म्हणून घेण्याच्याही लायकीची नसते. शिक्षक भरती करतानाच यापुढे कठोर निकष लावावे लागतील. त्यासाठी भरती प्रक्रियेत दुरुस्ती करावी लागेल. वशिल्याचे शिक्षक तर नकोतच. त्याचे वर्तन कसे आहे हे अगोदर तपासून पाहावे लागेल. बार्देश तालुक्यातही पूर्वी एक-दोन शिक्षकांवर विनयभंगाचे आरोप झाले होते. त्यातील एका शिक्षकास नंतर एका राजकीय पक्षाने व्यवस्थित सांभाळले. आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट, अनेक हायस्कूलमध्ये समुपदेशक आहेत. त्या समुपदेशकांचीही जबाबदारी आता वाढली आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन समुपदेशकांना अशा विद्यार्थिनींशी खोलात शिरून बोलावे लागेल. काळ फार कठीण आहे.