विद्यार्थ्याच्या थोबाडीत देणे शिक्षकाच्या अंगलट, मुख्याद्यापकावरही काराईची खात्याकडून शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:56 PM2017-10-24T23:56:51+5:302017-10-24T23:57:02+5:30
पणजी - ढवळी फोंडा येथील प्राथमिक शाळेत विद्या विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणातील चौकशी अहवाल शिक्षण खात्याला मिळाला असून त्यात शिक्षक आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनावर ठपका ठेवण्यात आला आहे. विद्याथ्याच्या मारहाणीच्या बाबतीत तथ्य असल्याचे म्हटले आहे.
कायद्याने विद्यार्थ्यांना शारीरिक त्रासाची शिक्षा देण्यास बंदी आहे, परंतु असे असतानाही अनेक विद्यालयात या कायद्याचा भंग केला जात असल्याचे आढळून येत आहे. ढवळी फोंडा येथील ढवळीकर प्राथमिक विद्यालयात एका ७ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षण खात्याकडे केली होती. या प्रकरणात शिक्षण खात्याच्या फोंडा विभागीय अधिकाºयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. विभागीय अधिका-याने या प्रकरणात सुनावणी घेऊन शिक्षण खात्याला अहवाल पाठविला आहे. या अहवालात शिक्षक आणि मुख्याद्यापकालाही दोषी ठरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारल्यामुळे विद्यार्थी घरी जाऊन लपून राहिला होता. पुन्हा कधी शाळेत जाणार नाही असे तो आपल्या पालकांना सांगत होता. त्यामुळे पालकांनी या प्रकरणात शिक्षण खात्याकडे तक्रार नोंदविली होती. विशेष म्हणजे या शिक्षिकेने या विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारली होती त्या शिक्षिकेची नियुक्तीही विद्यालयाने बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे खात्याला आढळून आले आहे. शिक्षण खात्याची परवानगी न घेताच ही नियुक्ती करण्यात आली आहे.
निर्णय सरकार घेणार
या प्रकरणातील चौकशी अहवाल शिक्षण खात्याकडून सरकारला पाठविण्यात आला असल्याची माहिती खात्याचे संचालक गजानन भट यांनी दिली. या प्रकरणात सबंधित विद्यालयाच्या मुख्य शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारसही करण्यात आली असल्याची माहिती सचिवालयातील सूत्रांकडून देण्यात आली. एक दोन दिवसात या प्रकरणात निर्णयही होण्याची शक्यता आहे.