म्हादई आंदोलनात उतरण्यास शिक्षक, विद्यार्थ्यांना मज्जाव; राज्यभरातून संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 02:37 PM2023-02-27T14:37:13+5:302023-02-27T14:38:08+5:30
या आदेशामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून सध्या आदेशावर संताप व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शिक्षकांनी म्हादई संबंधीच्या सभेस जाऊ नये. तसेच विद्यार्थ्यांनाही नेऊ नये, असा आदेश बार्देश तालुक्याच्या भाग शिक्षण अधिकाऱ्यांनी जारी केला आहे. या आदेशामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून सध्या आदेशावर संताप व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही प्रकारच्या म्हादई संदर्भातील सभेला शिक्षकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनाही या सभेत पाठविता येणार नाही. म्हादई संदर्भातील कोणत्याही उपक्रमाला किंवा कार्यक्रमाला जाता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. भाग शिक्षण अधिकाऱ्यांचा हा आदेश सोशल मिडियावर व्हायरल झाला असून लोकांकडून त्यावर कडक प्रतिक्रियाही उमटत आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेण्यास मनाई आहे, हा नियमच आहे. परंतु जाहीर सभेला एक नागरिक म्हणून उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जाहीर सभेला उपस्थित राहण्यास मज्जाव करण्याचा आदेश हा बेकायदेशीर ठरतो. तसेच विद्यार्थ्यांना म्हादईसंदर्भात स्पर्धेलाही नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे, हे कोणत्या नियमाअंतर्गत सांगण्यात आले आहे, त्याचे स्पष्टीकरण नाही.
उशिरा येणा शिक्षकांना इशारा
म्हादई संदर्भात शिक्षकांना इशारे देतानाच उशिरा शाळेत येणाऱ्या शिक्षकांनाही तंबी देण्यात आली आहे. काही शिक्षक सकाळी उशिरा शाळेत येतात आणि लवकर घरी जातात, असे आढळून आल्याचे आदेशात म्हटले आहे आणि असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे म्हटले आहे.
इतरही सूचना
या आदेशात केवळ म्हादई संदर्भातच सूचना नाहीत तर शिक्षकांनी वेळेवर शाळेत येण्यासंदर्भात, वैद्यकीय सुट्टी घेणाऱ्यांना वैद्यकीय दाखला सादर करण्याच्या संदर्भात, शिक्षण खात्याशी पत्रव्यवहार करण्यासंदर्भात, विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात आणि पुढील शैक्षणिक वर्षा संदर्भात वेळापत्रक तयार करण्यासंदर्भातही सूचना आहेत. आदेशात एकूण ८ सूचना असून त्यात म्हादई संदर्भातील सूचना ही ५ क्रमांकची आहे.
परिपत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही
शिक्षण खात्याच्या मुख्यालयातून अशा स्वरूपाचे परिपत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. - शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"