दिशा बदलणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान वाढ- डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 03:49 PM2020-02-26T15:49:28+5:302020-02-26T15:50:07+5:30
वाऱ्याच्या दिशेत वारंवार झालेल्या बदलामुळे यंदाच्या हिवाळ्यातही गोव्यात तापमान वाढीचे प्रकार बऱ्याचवेळा घडले आहेत.
- वासुदेव पागी
पणजी: वाऱ्याच्या दिशेत वारंवार झालेल्या बदलामुळे यंदाच्या हिवाळ्यातही गोव्यात तापमान वाढीचे प्रकार बऱ्याचवेळा घडले आहेत. हवामानातील हे बदल अनपेक्षित असले तरी ते सामान्यच असून अधून मधून तसे प्रकार घडत असल्याचे आपल्याला मागील काही वर्षाची तापमान विषयक माहिती पाहता आढळून येईल. अर्थात जागतिक तापमान वाढीचाही हा परिणाम आहे हेही मान्य करायलाच लागेल असे हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
डॉ. पडगलवार म्हणाले, ‘गोव्याचे तापमान 23 फेब्रुवारी रोजी 36.6 अंश सेल्सीअसपर्यंत तापल्यानंतर अनेकांनी हवामान खात्याशी संपर्क केला. अचानक इतक्या प्रमाणात तापमान वाढीचे कारण हे अनपेक्षित वाटले तरी ते धक्कादायक वगैरे काही नव्हते. उत्तरेकडून वाहणारा वारा जेव्हा आपली दिशा बदलून पूर्व -पश्चिम अशी दिशा धरतो, तेव्हा असे बदल होतात.
उत्तरेकडून येणा-या वा-यात गारवा असतो तर पूर्वेकडील वा-यात उष्णता असते. त्यामुळे असे बदल झाल्यावर तापमान तापत असते. असे दोन वेळा घडले आहे. 8 दिवसांपूर्वी तापमान 36.5 अंश एवढेपर्यंत गेले होते.जागतिक तापमान बदलाचा हा परिणाम असू शकतो का असे विचारले असता डॉ. पडगलवार म्हणाले, ‘जागतिक तापमान वाढीचे परिणाम कुणालाही चुकलेले नाहीत. गोव्यातील तापमान वाढीचाही नाही म्हटला तरी संबंध हा असणारच.’
यंदा पाऊस, उशिरा आला व उशिरा संपलाही, थंडीही उशिरा आली आणि संपलीही उशिरा. त्यामुळे ऋतूचक्र पुढे सरकत असल्याचे आपण म्हणू शकतो का असे विचारले असता त्यांनी यावर हवामान खात्याचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. एका किंवा दोन वर्षातील हवामानाचा अभ्यास करून ऋतुचक्रासंबंधी निष्कर्ष काढले जात नाहीत आणि तसे ते काढताही येत नाहीत असे त्यांनी सांगितले.