पणजीतील स्मार्ट रस्त्यांवर पुन्हा रुतला टेम्पो
By पूजा प्रभूगावकर | Published: February 26, 2024 12:23 PM2024-02-26T12:23:17+5:302024-02-26T12:23:45+5:30
स्मार्ट सिटीच्या कामांवर संताप व्यक्त होत आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पणजीतील स्मार्ट रस्त्यांवर सोमवारी पुन्हा एकदा टेम्पो रुतला. त्यामुळे शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांवर संताप व्यक्त होत आहे.
पणजी येथील आझाद मैदान परिसरात पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणारा टेम्पो रुतला. त्यामुळे टेम्पो चालक तसेच त्यातील कामगारांना सर्व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या टेम्पोतून काढून रस्त्यावर ठेवाव्यात लागल्या. त्यानंतर क्रेन आणून रुतलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला. सदर टेम्पो हा पणजीत पिण्याच्या पाण्याची डिलिव्हरी करण्यासाठी कुंडईहून आला होता.
शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु झाल्यापासून आता पर्यंत येथील रस्त्यांवर टेम्पो, ट्रक तसेच चारचाकी वाहने रुतणे तसेच कलंडल्याच्या घटना घडल्या आहेत. नववर्षाच्या पहाटे मळा भागात या कामांसाठी खोदलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने त्यात पडून एक दुचाकीचालक ठार झाला होता.