तळेखोल येथील खडी वाहतुकीला तात्पुरती स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:46 PM2019-12-20T23:46:47+5:302019-12-20T23:48:10+5:30
मात्र ग्रामस्थ आंदोलनावर ठाम
दोडामार्ग : अंधाधुंद खडी उत्खलनामुळे हैराण तळेखोल येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषण आरंभल्यानंतर तहसीलदार कार्यालयाने येथील खडी वाहतुकीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र पंचायत क्षेत्रातील खडी उत्खलन पूर्णपणे बंद होत नाही, तोवर उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रम पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, खाण विभागाचे अधिकारी शनिवारी तळेखोल गावाला भेट देणार असून यावेळी गावात तीव्र निदर्शने होण्याची शक्यता आहे.
गोव्याच्या सीमेलगत असलेल्या तळेखोल गावात सद्या पाच खडी क्रशर सुरु असून या क्रशरसाठी येथील जंगल परिसरात अंधाधुंद उत्खलन केले जात आहे. याचे गंभीर परिणाम सदया या गावात दिसून येत असून त्यामुळे गाव आक्रमक झाला आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या दुस-या दिवशी तळेखोल गावातील महिला मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी शिवसेनाच्या स्थानिक पुढाºयांसमवेत तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी तळेखोल येथील खडी वाहतूक तातडीने बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. परंतु यावेळी तहसीलदारांनी आडेवेढे घतल्याने ग्रामस्थ यावेळी आक्रम झाले. कारवाई न झाल्यास आंदोलनकारी तहसीलदार कार्यालयात येउन ठाण मांडतील असा इशारा यावेळी देण्यात आल्यानंतर वाहतूक बंद करण्यासंदर्भातील नोटीस आपण बजावतो असे सांगितले.
अधिकारी आज पाहणी करणार
सिधुदुर्ग व कोल्हापूर खाण विभागाचे अधिकारी आज शनिवारी तळेखाल गावाला भेट देणार असून येथील स्थितीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.