पणजीतील आणखी १० इमारती असुरक्षित
By admin | Published: September 16, 2014 01:18 AM2014-09-16T01:18:58+5:302014-09-16T01:22:09+5:30
पणजी : येथील खूप जुन्या अशा क्लब नॅशनल इमारतीच्या छपराचा काही भाग कोसळल्यानंतर पणजीतील असुरक्षित इमारतींबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
पणजी : येथील खूप जुन्या अशा क्लब नॅशनल इमारतीच्या छपराचा काही भाग कोसळल्यानंतर पणजीतील असुरक्षित इमारतींबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. पणजी शहरात आणखी दहा इमारती ह्या असुरक्षित असून त्या कधीही कोसळू शकतात अशा स्थितीत आहेत. महापालिकेने त्याबाबतचा अहवाल तयार केला आहे.
सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना महापौर सुरेंद्र फुर्तादो म्हणाले, की दोन विद्यालये, मार्केट प्रकल्प यांच्यासह अन्य काही अगदी जुन्या इमारती असुरक्षित बनल्या आहेत. कधीही कोसळू शकतील अशा पणजीतील दहा इमारतींची यादी महापालिकेने आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांना यापूर्वी दिलेली आहे. रॉड्रिग्ज यांनी ही यादी जिल्हास्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडे द्यायला हवी.
फुर्तादो म्हणाले, की प्रोग्रेस हायस्कूलची इमारत तसेच महात्मे हायस्कूलच्या इमारतीचाही या दहा धोकादायक इमारतींमध्ये समावेश आहे. तसेच पणजी मार्केट प्रकल्पातीलही एक इमारत धोकादायक आहे, तिथे अनेक लोक रोज भेट देत असतात. आयुक्त रॉड्रिग्ज यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करायला हवी.
दरम्यान, सिने नॅशनल थिएटरच्या इमारतीचा विषयही आम्ही कायद्याच्या दृष्टीने अभ्यासासाठी घेतला आहे. ती इमारत महापालिकेची आहे. ती इमारत पाडून तिथे पार्किंग प्रकल्प उभा करण्याचा विचार आहे. सिनेमागृह मालकास आम्ही त्याविषयी लिहिणार आहोत, असे फुर्तादो यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)