दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:59 AM2023-10-20T10:59:05+5:302023-10-20T11:00:03+5:30

म्हापशात १६ महिन्यांत वीजखात्याचा प्रताप 

ten thousand times the electricity disappeared like an unannounced load shedding | दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन

दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : म्हापशातील वीजसमस्या ही आता नित्याची बाब बनली आहे. दिवसातून किती वेळा वीजपुरवठा खंडित होतो, याचा थांगपत्ता लागत नसतो. खंडित झालेली वीज पुन्हा कधी सुरू होईल, याची शाश्वती नसते. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. उपलब्ध माहितीनुसार दर दिवशी किमान ५ ते ७ वेळा आणि मागील १६ महिन्यांत किमान १० हजार वेळा तरी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला आहे.

नुकसान होतेय; पण दखल घेतोय कोण?

खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे विजेची अनेक उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून नागरिकांना बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. गरजेच्या वेळी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. काही वेळा तर अघोषित भारनियमन असते. खंडित पुरवठ्याची झळ फक्त सामान्य नागरिकांना झाली नसून बऱ्याच व्यावसायिकांनाही त्याचा त्रास नुकसानीच्या रूपात सहन करावा लागत आहे. मुलांच्या अभ्यासावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठांच्या आरोग्यावरही परिणाम झाले आहेत. व्यावसायिकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा जबर फटका बसत आहे.

वीजपुरवठ्यातही अनियमितता

ऊन, वारा, पाऊस असो किंवा नसो; वीजपुरवठा मात्र कारण नसतानाही खंडित होत असतो, असा आरोप म्हापसावासीयांकडून केला जात आहे. काहीवेळा पुरवठ्यात अनियमितताही असते. खंडित पुरवठ्याबरोबर विजेचा उच्च दाबाने, तर काहीवेळा कमी दाबाने पुरवठा सुरू असतो. पुरवठ्यातील अनियमिततेमुळे विद्युत उपकरणांवर परिणाम होतो. बऱ्याच नागरिकांचे फ्रिज, टीव्ही, वायफाय राउटर, लॅपटॉप, वातानुकूलित यंत्रणा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.

आरोग्यावरही होतोय परिणाम

खंडित होणाऱ्या पुरवठ्याचे अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याचे प्रकार घडले आहेत. म्हापसावासीयांनी दिलेल्या माहितीनुसार खंडित पुरवठ्यातून वाढत्या उष्म्यामुळे अस्वस्थता वाढण्याच्या घटना घडल्या आहेत. खंडित पुरवठ्यामुळे आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, असाही प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

तक्रारदारालाच उद्धटपणाची वागणूक

वीज पुरवठ्यावर तक्रार केल्यास जात नाही. उपकेंद्रावरील कर्मचायांकडून योग्य प्रकारे सहकार्य केले कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणाची वागणूक, दिली जाते. तक्रारींसाठी फोनसुद्धा लागत नाही. पावसाळ्यात पुरवठा खंडित होण्याचे प्रकार बरेच वाढले होते, अशीही माहिती नागरिकांनी दिली

भूमिगत वाहिनी खोदकामांचाही फटका

सध्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु आहे. गेल्या वर्षी सुरु केलेले काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा विभागीय कार्यालयाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हे काम केव्हा पूर्ण होईल, याची शाश्वती मात्र नाही. खोदकामामुळे रस्त्यांची दुरुस्ती वेळेवर केली नसल्याने तोही त्रास सहन करण्याची वेळ लोकांवर आली आहे.

पाऊस असो किंवा नसो, दिवसाबरोबर रात्रीच्या वेळीसुद्धा त्रास सहन करावा लागतो. पुरवठा खंडित होण्यामागची कारणे अस्पष्ट असून हेल्पलाइन नंबरसुद्धा कार्यान्वित नसतो. याचा फटका सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही बसत आहे. - अॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक, म्हापसा

म्हापशातील वीजपुरवठा कधी खंडित व पूर्ववत होईल याची शाश्वती नसते. बयाच वेळी पूर्वकल्पना न देता पुरवठा बंद केला जातो. तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही. म्हापसा शहर दुर्लक्षितांचे बनू लागले आहे. -श्रीपाद येंडे, म्हापसा

म्हापसा शहरात सध्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे काही भागांत उच्चदाबाची भूमिगत वाहिनी घालण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा पुरवठा खंडित करावा लागतो. नागरिकांनी आणखी महिनाभर सहकार्य करावे. सुभाष पार्सेकर, कार्यकारी अभियंता.


 

Web Title: ten thousand times the electricity disappeared like an unannounced load shedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.