गोव्यात किनारपट्टी स्वच्छतेसाठी निविदा जारी, पहिले चार्टर विमान उद्या गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 06:47 PM2018-10-02T18:47:09+5:302018-10-02T19:51:10+5:30

यापूर्वी प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या व सर्वबाजूंनी टीकेला कारण ठरलेल्या किनारपट्टी स्वच्छतेच्या विषयामुळे पर्यटन खात्याने आता नव्याने कंत्राट देताना बरीच काळजी घेण्याचे ठरवले आहे, असे सुत्रांनी सांगितले.

Tender for cleanliness in coastal of Goa, first charter plane in Goa | गोव्यात किनारपट्टी स्वच्छतेसाठी निविदा जारी, पहिले चार्टर विमान उद्या गोव्यात

गोव्यात किनारपट्टी स्वच्छतेसाठी निविदा जारी, पहिले चार्टर विमान उद्या गोव्यात

Next

पणजी : राज्यातील किना-यांच्या स्वच्छतेसाठी पर्यटन खात्याने आता नव्याने कंत्राट देण्यासाठी निविदा जारी केली आहे. यापूर्वी प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या व सर्वबाजूंनी टीकेला कारण ठरलेल्या किनारपट्टी स्वच्छतेच्या विषयामुळे पर्यटन खात्याने आता नव्याने कंत्राट देताना बरीच काळजी घेण्याचे ठरवले आहे, असे सुत्रांनी सांगितले.

उत्तर व दक्षिण गोव्याच्या सर्व किना-यांवरील कचरा उचलणे,ओला व सुका कचरा वेगळा करणे, त्या कचऱ्यांची वाहतूक करून मग त्याची विल्हेवाट लावणे हे सगळे काम करण्यासाठी मंगळवारी ई- निविदा जारी झाली आहे. इच्छुकांनी दि. 10 ऑक्टोबरपर्यंत आपले प्रस्ताव ई-टेंडर पद्धतीने सादर करणे पर्यटन खात्याला अपेक्षित आहे. नव्या पर्यटन मोसमाचे पहिले चार्टर विमान उद्या बुधवारी रशियाहून गोव्यात दाखल होणार आहे. म्हणजेच उद्यापासून या नव्या मोसमाला आरंभ होईल. राज्यातील किनारे स्वच्छ करण्याचे काम सध्या दृष्टी ह्या जीवरक्षक संस्थेकडून केले जात आहे. यापूर्वी ज्या कंपन्यांनी कचरा स्वच्छतेचे कंत्रट मिळवले होते, त्या कंपन्या वादग्रस्त ठरल्या. त्यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे प्रकरण गेले. लोकायुक्तांनी चौकशी करून एका माजी पर्यटन मंत्र्यासह पर्यटन खात्याच्या अधिका-यांवरही ठपका ठेवला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहचले होते. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडेही हे प्रकरण आहे. आता नव्याने किनारपट्टी स्वच्छता कंत्राट देताना कोणती काळजी घ्यावी ते पर्यटन खात्याला कळाले आहे. तथापि, राज्यातील अनेक एनजीओंचे या विषयावर लक्ष आहे. किनारपट्टी स्वच्छतेचे काम हे सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाने करावे असे पूर्वी ठरले होते पण हे काम आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न पर्यटन खात्याने केल्यामुळे हा विषय यापुढे अधिक चर्चेस येऊ शकतो.

एक हजार चार्टर विमाने गोव्यात
2017-18 साली गोव्यात एकूण 969 चार्टर विमानांमधून 2 लाख 45 हजार विदेशी पर्यटक आले होते. 2016-17 साली 988 चार्टर विमाने आली होती व त्याद्वारे 2 लाख 32 हजार 679 पर्यटक दाखल झाले होते. 2015-16 साली 798 चार्टर विमाने आली होती व त्याद्वारे 1 लाख 58 हजार विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. यावेळी पर्यटन मोसमावेळी सुमारे एक हजार चार्टर विमाने गोव्यात येतील असे अपेक्षित आहे.

Web Title: Tender for cleanliness in coastal of Goa, first charter plane in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा