जुवारी पुलासाठी निविदा प्रक्रिया

By admin | Published: September 8, 2015 01:56 AM2015-09-08T01:56:10+5:302015-09-08T01:56:26+5:30

पणजी : उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या जुवारी पुलासाठीची निविदा प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे. त्याचबरोबर मडगाव व काणकोण बायपासच्या

Tender process for Jwari bridge | जुवारी पुलासाठी निविदा प्रक्रिया

जुवारी पुलासाठी निविदा प्रक्रिया

Next

पणजी : उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या जुवारी पुलासाठीची निविदा प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे. त्याचबरोबर मडगाव व काणकोण बायपासच्या कामांसह वेर्णा औद्योगिक वसाहत ते लोटलीपर्यंतच्या चौपदरी
रस्ता कामाच्या निविदा जारी झाल्या
आहेत. ही कामे एकूण ७४० कोटी रुपये खर्चाची आहेत.
प्रत्यक्ष जुवारी पूल आणि जोडरस्ते व उड्डाण पूल अशी योजना ही सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाची आहे. जुवारीवर समांतर असा आठ पदरी केबल स्टेड पूल उभा केला जाणार आहे. सुमारे सातशे मीटर लांबीचा हा पूल असेल. आठ पदरी केबल स्टेड हा गोव्यातील पहिलाच पूल ठरणार आहे. प्रत्यक्ष पुलाच्या कामावरील खर्च हा आठशे कोटींच्या आसपास असेल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने अपेक्षित धरले आहे. एकूण पाच टप्प्यांमध्ये पूल, उड्डाण पूल व चौपदरी जोडरस्त्यांचे काम सुरू होणार आहे. येत्या १९ डिसेंबरपूर्वीच पुलाच्या कामाची पायाभरणी करण्याचा बांधकाम खात्याचा प्रयत्न आहे.
गेल्या आठवड्यात गोव्यातील बांधकाम खात्याच्या अभियंत्यांची टीम दिल्लीत होती. जुवारी पुलाच्या कामासाठी निविदा अजून जारी झालेली नाही; पण प्रत्यक्ष निविदा काढण्यापूर्वी निविदाविषयक जी प्रक्रिया सुरू करावी लागते, ती केंद्र सरकारच्या स्तरावरून सुरू करण्यात आली आहे. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, जुवारी पुलाची निविदा पुढील महिन्याभरात जारी होणार आहे. बहुतांश सोपस्कार पूर्ण झाले आहेत. बांबोळी ते वेर्णा अशा पट्ट्यात चौपदरीकरण केले जाणार असून त्यात आठ पदरी जुवारी पुलासह काही उड्डाण पुलांचा समावेश आहे. एकूण चौदा किलोमीटरच्या पट्ट्यात सारी कामे केली जातील.
केंद्रीय मंत्री बनल्यानंतर नितीन गडकरी पहिल्यांदा गोव्यात आले होते, त्या वेळी त्यांनी गोव्यातील ‘मिसिंग लिंक’च्या कामांना मान्यता दिली होती. त्या कामाची निविदा आता जारी झाली आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीकडून लोटलीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे.
या कामावर एकूण १४० कोटी रुपये
खर्च होणार आहेत.
बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंते उत्तम पार्सेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने मडगाव व काणकोण बायपासच्या कामांसाठीही निविदा जारी केल्या आहेत. यावर एकूण सहाशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Tender process for Jwari bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.