तेंडुलकरांनी पद सोडावे, असंतुष्ट नेत्यांच्या बैठकीत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 09:45 PM2018-11-08T21:45:38+5:302018-11-08T22:45:09+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तत्काळ पक्षाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडावे आणि गोव्यात भाजप पक्ष संघटनेची फेररचना केली जावी, अशा मागण्या भाजपच्या माजी मंत्री व माजी आमदारांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.
म्हापसा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तत्काळ पक्षाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडावे आणि गोव्यात भाजप पक्ष संघटनेची फेररचना केली जावी, अशा मागण्या भाजपच्या माजी मंत्री व माजी आमदारांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. डिसोझा यांच्यासह माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक व माजी सभापती अनंत शेट यांनी बैठकीत भाग घेतला. बैठकीनंतर पार्सेकर यांनी सांगितले,की तेंडुलकर हे कसे अकार्यक्षम आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अपात्र आहेत याविषयी आम्ही बैठकीत चर्चा केली. तेंडुलकर यांच्या कार्यपद्धतीवर सगळे नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. सर्व मतदारसंघांमधून अशीच माहिती मिळत आहे. तेंडुलकर जेवढे लवकर पद सोडतील तेवढे पक्षासाठी ते हिताचे ठरेल.
पार्सेकर म्हणाले, की आम्ही पुन्हा एकत्र येऊ. सध्या दिवाळी असल्याने काहीजण बैठकीला पोहचू शकले नाहीत. तेंडुलकर यांनी राजीनामा द्यावा ही एकमुखी मागणी आहे. आम्ही बंडखोर नव्हे. जे दोघे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले ते बंडखोर आहेत. आम्ही भाजपाच्या हिताच्यादृष्टीने बोलत आहोत. पक्षात संघटनात्मक बदल व्हायला हवेत. तेंडुलकर यांच्याकडेच जर नेतृत्व राहिले तर पक्ष अधिक कमकुवत होईल.
शिरोड्यात पराभव : नाईक
शिरोड्यात आम्ही पोटनिवडणुकीवेळी भाजप उमेदवाराचा पराभव करू. आमचा तो निर्धारच आहे, असे महादेव नाईक यांनी सांगितले. तुम्ही पक्ष सोडणार काय किंवा तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार काय असे विचारले असता, या प्रश्नांना योग्यवेळी उत्तर देईन, असे ते म्हणाले. कार्यकर्त्याचा विश्वासघात झालेला आहे व त्यामुळे आम्ही भाजप उमेदवाराला शिरोड्यात जिंकू देणार नाही असे नाईक म्हणाले. प्रशासन चालत नाही असे लोक म्हणतात. मायकल लोबो हेही तसेच बोलतात. गोवा विधानसभा उपसभापतीही प्रशासन ठप्प झाले आहे, लोकांना नोक-या मिळत नाही, असे म्हणतात तेव्हा लोकही ते मान्य करतात. पक्षाने सरकारची स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे, असे माजी मंत्री मांद्रेकर म्हणाले. पर्रीकर आजारी आहेत पण त्यांना नेतेपदावरून काढण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
आर्लेकर अनुपस्थित
दरम्यान, राजेंद्र आर्लेकर, गणेश गावकर, किरण कांदोळकर, दिलीप परुळेकर हेही या बैठकीला येतील असे काही जणांना अपेक्षित होते. मात्र भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनी वेगळी फिल्डिंग लावली होती व त्यामुळे बैठकीला काही जण पोहोचले नाहीत, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. आर्लेकर हे पुणे येथे गेले. इतर नेते मात्र गोव्यात आहेत पण बैठकीला आले नाही.
Goa BJP president Vinay Tendulkar is inefficient and cannot take decisions on his own and therefore he should resign. The party high command should act on this: Former Goa Chief Minister & BJP leader Laxmikant Parsekar #Goapic.twitter.com/CF5CLqEhK4
— ANI (@ANI) November 8, 2018