मद्यपी पर्यटकांची दहशत, धिंगाणा सुरुच 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:30 AM2023-11-15T07:30:02+5:302023-11-15T07:30:31+5:30

बहुतांश पर्यटक जीवाचा गोवा करायला येतात. 

terror of drunken tourists continues in goa | मद्यपी पर्यटकांची दहशत, धिंगाणा सुरुच 

मद्यपी पर्यटकांची दहशत, धिंगाणा सुरुच 

पुण्याहून गोव्यात आलेल्या एका मद्यपी पर्यटकाने आपले वाहन उत्तर गोव्याच्या किनारी भागातील एका रिसॉर्टमध्ये घुसविले. रिसॉर्टच्या काउंटरवरील मालकीण या अपघातात नाहक मरण पावली. यामुळे पूर्ण गोवा हादरला. पर्यटकांनी अशा प्रकारे दारूच्या नशेत वागण्याची ही पहिलीच घटना नव्हे. गोव्यात अधूनमधून पर्यटकांचा धिंगाणा सुरूच असतो. दंगामस्ती करणाऱ्यांना पोलिसांकडून अटकही केली जाते. मग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून गोव्याची बदनामी करण्याची संधी काहीजण घेतात, अर्थात हा वेगळा विषय आहे. पर्यटक विरुद्ध गोमंतकीय असा संघर्ष सुप्तावस्थेत सुरूच असतो. मात्र पर्यटक मद्य पिऊन वाहन चालवून अपघात घडवतात तेव्हा मात्र गोमंतकीयांच्या भावना तीव्र होतात. परवाही तेच घडले. अनेकांना मग पोलिस स्थानकावर धाव घ्यावी लागली. महिलेचा जीव घेणाऱ्या पर्यटकाला अटक करून पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक गोव्याला भेट देतात. यात ७० लाख देशी असतात. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात व राजस्थानातून बहुतांश पर्यटक जीवाचा गोवा करायला येतात. 

गोव्यातले मद्याचे धबधबे फेसाळतात, स्वस्तात दारू मिळणारे ठिकाण म्हणजे गोवा असा गैरसमज पर्यटकांच्या मनात असतोच. गोव्यात बिकिनी संस्कृती असून कसिनो जुगारात गोवा रममाण झालाय, असे अतिरंजित चित्र पर्यटकांच्या मनात असते. थायलंडप्रमाणे गोव्यातही मुली, महिला उपलब्ध असतात हा तर अत्यंत चुकीचा समज पर्यटकांनी करून घेतलेला आहे. स्वैर, बेजबाबदार वर्तन करून पर्यटक मार किंवा तुरुंगाची हवा खातात. अलिकडे दर आठवड्याला एक तरी अशी घटना घडतेच. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यापूर्वीही अशा अप्रिय घटनांविषयी चिंता व्यक्त केली होती. निष्पाप पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्री सावंत वावरतातच, त्याचबरोबर पर्यटकांनी दारू पिऊन गैरवर्तन करू नये असा सल्लाही देत असतात. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पर्यटक वाहने थांबवून चालकांची अल्कोमीटरने तपासणी सुरू केली आहे. यामुळे आपली सतावणूक होतेय, असे दारू न पिणाऱ्या अवघ्याच पर्यटकांना वाटू शकेल. मात्र पर्याय नाही. मद्यपी पर्यटकांनीच गोव्यावर ही वेळ आणली आहे. 

गोव्याचे खारे वारे, ताजे मासे, शहाळ्याचे मधुर पाणी, चवदार खाद्यसंस्कृती, फेसाळता समुद्र, पोर्तुगीजकालीन पांढऱ्याशुभ्र चर्चेस आणि तेजस्वी दिमाखदार मंदिरे हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. रुपेरी वाळूत चालणे व सूर्यकिरणे अंगावर खेळवत किनाऱ्यांवर दिवसभर पहुडणे विदेशी पर्यटकांना आवडते. काळ्याशार खडकांवर आदळून फुटणाऱ्या मनमोहक शुभ्र लाटा प्रेमीयुगुलांना भुरळ पाडतात. गोवा म्हणजे वेडिंग डेस्टीनेशन, गोवा म्हणजे हनिमून स्थळ, गोवा म्हणजे खाओ, पिओ, मजा करो अशी तारुण्यसुलभ भावना पर्यटकांमध्ये असते. यात काही गैर नाही. मात्र पहाटेपर्यंत पाय करून पॅगुळलेल्या डोळ्यांनी वाहन चालवून अपघात घडविणारे पर्यटक अलिकडे वाढले आहेत. क्लबमध्ये किंवा कसिनो जुगाराच्या जहाजांवर जाऊन प्रचंड पैसा उधळणारे धनिक पर्यटक गोव्यात वाढत आहेत. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला यामुळे बळकटी मिळते. म्हणून ३६५ दिवस पर्यटन अशी जाहिरात गोवा सरकार करते. इथपर्यंत सारे ठिक आहे. पर्यटक बेपर्वाईने वाहन चालवून लोकांचा बळी घेतात तेव्हा मात्र गोमंतकीयांच्या सहनशीलतेचा अंत होतो.

रेमेडिया आल्बुकर्क या ४७ वर्षीय रिसॉर्ट मालकिणीचा कोणताही दोष नव्हता. ती रिसेप्शन काउंटरवर उभी राहून फोनवर बोलत होती. सचिन वेणूगोपाल कुरुप नावाच्या पर्यटकाने आपले वाहन रिसॉर्टमध्ये घुसविले आणि तिला उडविले. मद्यपी चालक पर्यटकाने रिसॉर्टमध्ये ५०-६० मीटर आत वाहन घुसविले. ही घटना जगप्रसिद्ध वागातोर किनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर घडली. गोव्याच्या किनारी भागात रात्री दहानंतर किंवा पहाटे फिरणे स्थानिक लोक टाळू लागले आहेत. काहीवेळा ड्रग्जच्या आहारी गेलेले पर्यटक चाकूने हल्लादेखील करतात. किरकोळ वाहन अपघात झाला तरी प्रकरण हातघाईवर येते. काहीवेळा मद्य पिऊनच गोव्यात येताना विमानात सहप्रवासी किंवा हवाईसुंदरींशी पर्यटकांनी गैरवर्तन केल्याचीही उदाहरणे आहेतच. मद्यपी पर्यटकांची दहशत रोखण्यासाठी गोवा पोलिस यापुढे आणखी प्रभावी उपाययोजना करू पाहत आहेत.

 

Web Title: terror of drunken tourists continues in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.