दहशतवादाला थारा देणारेही तेवढेच घातक
By admin | Published: October 17, 2016 05:49 AM2016-10-17T05:49:53+5:302016-10-17T05:50:23+5:30
दहशतवाद्यांएवढेच त्यांना थारा देणारेही जगाच्या दृष्टीने घातक आहेत
बाणावली (गोवा) : दहशतवाद्यांएवढेच त्यांना थारा देणारेही जगाच्या दृष्टीने घातक आहेत, असे नमूद करून ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच ‘ब्रिक्स’ देशांनी याविरुद्ध एकदिलाने व अग्रक्रमाने लढा देण्याचा निर्धार रविवारी जाहीर केला.
गेले दोन दिवस येथे भरलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या समारोपप्रसंगी या देशांदरम्यान झालेल्या मतैक्याचा ‘गोवा डिक्लेरेशन’ नावाचा एक दस्तावेज जाहीर करण्यात आला. भारत या यजमान देशाचे नेते या नात्याने पंतप्रधान मोदी यांनी हा जाहिरनामा वाचून दाखविला. या परिषदेत जगाला असलेला वाढत्या दहशतवादाचा धोका हा मुख्य विषय राहिला व या जाहिरनाम्यातही त्याचेच प्रतिबिंब दिसले.
‘ब्रिक्स’चा निर्धार जाहीर करताना मोदी म्हणाले, ‘दहशतवाद आणि हिंसाचारी शक्तींना पोसणारे, त्यांना आश्रय देणारे, व त्यांची पाठराखण करणारे हेही आमच्यासाठी खुद्द दहशतवाद्यांएवढेच धोकादायक आहेत, यावर आमचे एकमत झाले. दहशतवाद, धार्मिक कट्टरवाद आणि अतिरेकीवाद यापासून असलेला धोका आम्ही सर्वांनी मान्य केला.
‘गोवा डिक्लेरेशन’मध्ये ‘ब्रिक्स’ देशांमधील सहकार्याचा सर्वंकष असा भावी मार्ग ठरविण्यात आला असून सीमापार दहशतवादासह सर्वच प्रकारचा दहशतवाद आणि त्यांना साथ देणारे यांच्याविरुद्ध लढा देण्यास त्यात प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय शिखर परिषदेतील नेत्यांनी ज्या इतर मुद्द्यांवर भर दिला त्यात आर्थिक विकास आणि पर्यावरण रक्षण यांत समन्वय साधण्याचाही समावेश होता. हवामान बदलास आळा घालण्याच्या उपायांसंबंधीचा पॅरिस करार अपेक्षेहून लवकर लागू होत असल्याचे आम्ही स्वागत करतो व हा करार २ आॅक्टोबर रोजी संमत केल्याचा भारतास अभिमान वाटतो, असेही मोदी म्हणाले. ‘ब्रिक्स’ देशांनी स्थापन केलेल्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ने एक वर्ष पूर्ण केले आहे. या बँकेने पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान विकास आणि अक्षय ऊर्जासाधने यावर भर देणे सुरु ठेवावे, असेही या शिखर परिषदेत ठरले. याच्या जोडीला ‘ब्रिक्स’ची स्वत:ची स्वतंत्र ‘रेटिंग एजन्सी’ स्थापन करण्याच्या कामाला गती देण्याचेही ठरले. ही आठवी ‘ब्रिक्स’ शिखर परिषद होती. पुढील शिखर परिषदेचे यजमानपद चीनकडे असेल. बांगलादेश, म्यानमार, नेपाळ व थायलँंड या देशांना निमंत्रित म्हणून परिषदेसाठी बोलाविण्यात आले होते. या निमंत्रित देशांच्या प्रतिनिधींनीही आपसात व सदस्य देशांशी बैठका घेऊन उभयपक्षी विषयांवर चर्चा केली. (विशेष प्रतिनिधी)
>यश-अपयशही
उरी येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक्स या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला लक्ष्य करण्यात व राष्ट्रीय हितासाठी प्रसंगी सीमा ओलांडूनही कारवाई करण्याचा हक्क ‘ब्रिक्स’ नेत्यांना पटवून देण्यात भारताला यश आले.
मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी वाटाघाटी केल्या. चीनला पूर्णपणे आपल्याकडे वळवण्यात मोदींना अपयश आले.