बासमती तांदळाचा पुरवठा करण्याचं भासवून 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनाला गोव्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 08:50 PM2019-05-17T20:50:58+5:302019-05-17T20:51:03+5:30
बासमती तांदळाचा पुरवठा करू असे सांगून गोव्यातील अनेकांना करोडोंचा गंडा घालणा-या अझिम इस्माईल खान (46) या ठकसेनाला मडगाव पोलिसांनी जेरबंद केले.
- सूरज पवार
मडगाव: बासमती तांदळाचा पुरवठा करू असे सांगून गोव्यातील अनेकांना करोडोंचा गंडा घालणा-या अझिम इस्माईल खान (46) या ठकसेनाला मडगाव पोलिसांनी जेरबंद केले. गुरुवारी रात्री त्याला पोलिसांनी ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली. संशयिताने 2 कोटी 20 लाख 22 हजारांचा आतापर्यंत गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे. हा आकडा आणखीन वाढण्याचीही शक्यता आहे. आपल्याकडील रक्कम खर्च केल्याचे तो पोलीस तपासात सांगत आहे. काल शुक्रवारी त्याला अधिक तपासासाठी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
मडगाव पोलीस ठाण्याचा ताबा सदया कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्याकडे आहे. परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरिन सिक्वेरा पुढील तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या 406 व 420 कलमाखाली अझिम याच्याविरुद्ध मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नावेली येथील गुलशर अहमद मरुफ अहमद हे तक्रारदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अहमद व त्याच्या एका नातेवाईकांकडून संशयिताने अंदाजे 75 लाख रुपये उचलले होते. बासुमती तांदूळ पुरवू असे सांगून त्याने अनेकांकडून रक्कम घेतली होती. व्यवसायातून मिळालेल्या नफ्फाचा अर्धा - अर्धा हिस्सा वाटून घेणो असा सौदा ठरला होता. लोकांकडून रक्कम घेतली तरी अङिामने तांदुळ पुरवठाचा कधीच व्यवसाय केला नव्हता. दुस-याकडून पैसे उचलून नंतर ते पुर्वी रक्कम घेतलेल्या काही जणांना त्याने दिलेही होते. अझिम हा घोगळ येथे रहात आहे. काहीही काम न करता त्याने अशा प्रकारे तब्बल अडीच कोटींची कमाई केली होती हे आता तपासात उघड झाले आहे.
गुलशन याने अझिमकडे धनादेश तसेच ऑनलाईन पध्दतीने व्यवहार केला होता. अन्यजणांनीही अशाच प्रकारे त्याच्याकडे व्यवहार केला होता असे तपासात उघड झाले आहे. संशयित अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. 2018 डिसेंबर महिन्यात त्याने तक्रारदाराकडून रक्कम उचलेली होती. मात्र त्यानंतर त्याने तांदळाचा पुरवठाही केला नव्हता व वरुन रक्कमही अदाही केली नव्हती. आपण फसविलो गेलो आहोत हे लक्षात आल्यानतंर शेवटी गुलशर यांनी मागाहून यासंबधी मडगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंद केली होती.
दिलेली रक्कम वायदानुसार मिळत असल्याने अझिमची चांगलीच पब्लिसिटीही झाली होती. रक्कम मिळालेले लोक आपसूकच दुस-यांना अझिमबद्दल सांगायचे, त्यामुळे त्याच्याकडे गुंतवणूक करणा-यांचीही यादी वाढत गेली होती. मात्र नंतर घेतलेली रक्कम परत होत नसल्याने आपण फसविले गेल्याचे अनेकांच्या लक्षात आले. मागाहून या प्रकरणी पोलीस तक्रार नोंद झाली अन शेवटी अझिम पोलिसांच्या तावडीत सापडला. संशयिताचे अन्य कुणाकडे कनेक्शन आहे का याचाही तपास सद्या चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.