राज्यात २७ रोजीपासून २८व्या कोंकणी नाटक महोत्सव २०२४चे आयोजन
By समीर नाईक | Published: February 22, 2024 03:53 PM2024-02-22T15:53:33+5:302024-02-22T15:53:47+5:30
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन २७ रोजी मोरजी येथे होणार आहे.
पणजी: गोवा कोंकणी अकादमी यांच्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा कला संघ, मोरजी यांच्या साहाय्याने २८ व्या कोंकणी नाटक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मोरजी येथील श्री देव कळस मांगर सभाघर येथे होणार आहे, अशी माहिती गोवा कोंकणी अकादमीचे सदस्य प्रसन्न कुमार शेटगावकर यांनी दिली. पणजीत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसन्न कुमार शेटगावकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत गौतम शेटगावकर, सूर्यकांत पेडणेकर, नितीन शेटगावकर व अकादमीच्या सचिव मेघना शेटगावकर उपस्थित होत्या.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन २७ रोजी मोरजी येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रेचे आमदार जीत आरोलकर उपस्थित असणार आहे. तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कलाकार व्ही. जी. शेटगावकर, सन्मानीय पाहुणे म्हणून मोरजीचे सरपंच उमेश गडेकर, व जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांची उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ६.३० वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. तसेच ३ मार्च रोजी या नाटकांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, येथेच निकालही जाहीर करण्यात येणार आहे, असे शेटगावकर यांनी यावेळी सांगितले.
दि. २७ रोजी गोपाळ भांगी लिखित एकार एक फ्री, २८ रोजी डॉ. तन्वी बांबोळकर लिखित हिडिंबा, २९ रोजी विष्णू सूर्या वाघ लिखित तीन पैश्यांचो तियात्र, १ मार्च रोजी डॉ. जयंती नायक लिखित कन्यादान, व २ मार्च रोजी रघुनाथ सकोर्डेकर लिखित कर्मभोग या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. प्रत्येक दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून या नाटकांना सुरुवात होणार आहे. तळागाळात कोंकणी पोहचली पाहिजे, रुजली पाहिजे म्हणून गावागावात कोंकणी नाट्य महोत्सव आम्ही करण्याचे ठरविले होते, त्यानुसार आम्ही यंदा मोरजी येथे हा महोत्सव करण्याचे आम्ही ठरविले आहे, असेही शेटगावकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.