भोमा येथील आंदोलन चिघळले; सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:38 PM2023-12-20T17:38:54+5:302023-12-20T17:39:12+5:30
सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रशासन अधिकारी भोम येथे सीमांकन करण्यासाठी पोहोचले. अधिकारी आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले.
- अजय बुवा
फोंडा : भोम येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गप्रकरणी चालू असलेले आंदोलन बुधवारी चांगलेच चिघळले. जमिनीचे सीमांकन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना रोखल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी १०० ग्रामस्थांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी थेट कुळे पोलिस ठाण्यात केली. तीन तास ग्रामस्थानी पोलिसांशी हुज्जत घातली.
सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रशासन अधिकारी भोम येथे सीमांकन करण्यासाठी पोहोचले. अधिकारी आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. प्रकल्पाला विरोध करणारे संजय नाईक हेही घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण उच्च न्यायालयात असताना सीमांकन कसे काय करता? असा सवाल करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना वाचारत धारेवर धरले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, संयुक्त मामलेदार संगीता बिर्जे आदी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांचा आक्षेप असतानाही मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ग्रामस्थ धावून जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे ते पाहून ग्रामस्थ आणखीनच खवळले व त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यास सुरुवात केली. आंदोलनात महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ग्रामस्थांची धरपकड
आंदोलक आक्रमक बनल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरू केली. काही युवकांना पोलिसांनी पकडून ठेवले. अटक करणार तर सगळ्यांनाच अटक करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. परंतु त्या अगोदर सीमांकन बंद ठेवा, असा आग्रह धरला. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून चार बसमध्ये कोंबून कुळे येथील पोलीस ठाण्यात आणले.
सरपंचांनाही उचलले
ग्रामस्थांना ताब्यात घेण्याचे सत्र चालू झाल्याचे लक्षात येताच सरपंच दामोदर नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन कुळे येथे त्यांची रवानगी केली.
हे सर्व मंत्र्यांनीच घडवून आले : ग्रामस्थ
ज्यावेळी पोलिसांनी अटक सत्र सुरू केले त्यावेळी काही महिला प्रसार माध्यमांकडे बोलताना म्हणाल्या की, काहीच चूक नसताना जबरदस्तीने आमच्या मुलांना पोलिसांनी बसमध्ये टाकले आहे. हा प्रकल्प आम्हाला नको आहे. परंतु आमदार गोविंद गावडे यांच्यामुळे हा प्रकल्प येत आहे. आज जे प्रकरण घडले त्याला मंत्रीच जबाबदार आहेत. सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्रामस्थांची दुपारी मुक्तता करण्यात आली.