गोव्यात पहिल्या चार्टर विमानाचे आगमन १ ॲाक्टोबरला शक्य
By किशोर कुबल | Published: August 18, 2023 03:10 PM2023-08-18T15:10:43+5:302023-08-18T15:11:14+5:30
किशोर कुबल पणजी : गोव्यात यंदा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी १ ॲाक्टोबरला रशियातून मॉस्को येथून पहिले चार्टर विमान येण्याची ...
किशोर कुबल
पणजी : गोव्यात यंदा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी १ ॲाक्टोबरला रशियातून मॉस्को येथून पहिले चार्टर विमान येण्याची शक्यता आहे. गोव्याला रशिया, ब्रिटन, कझाकिस्तान आणि इस्रायलकडून पर्यटक मिळतील, अशी अपेक्षा आहे.
गेल्या हंगामात काही टूर ऑपरेटर इस्रायलमधील त्यांच्या समकक्षांच्या संपर्कात होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून आले नाहीत. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी गोव्याला इस्रायलकडून पर्यटक मिळाले होते. परंतु नंतर ते थांबले. कोविड महामारीच्याआधी दरवर्षी अडीच ते तीन लाख विदेशी पर्यटक गोव्याला भेट देत असत. ९०० हून अधिक चार्टर विमाने गोव्यात येत असत. रशिया, इंग्लंडमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे.
दरवर्षी गोव्याचे पर्यटनमंत्री, अधिकारी विदेशात पर्यटन मेळ्यांमध्ये सहभागी होत असतात. ज्या देशात जातील तेथे ‘रोड शो’ करतात. परंतु त्याचे फलित मात्र दिसत नाही, अशी व्यावसायिकांची तक्रार आहे. पर्यटन व्यावसायिकांनी या प्रकाराला सरकारचे चुकीचे मार्केटिंग धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, असे आढळून आले आहे कि,‘रशियाचे पर्यटक जास्त खर्च करत नाहीत. त्या तुलनेत ब्रिटिश पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि त्याचा गोव्यातील पर्यटन उद्योगांना फायदा होतो. रशियन पर्यटक एक तारांकित किंवा दोन तारांकित अशा छोट्या हॉटेलांमध्ये राहतात. रशियन चार्टर विमानांमधून येणारे पर्यटक हे कारागीर, पेंटर अशा पद्धतीचे लहान व्यवसायिक पैशांची बचत करून फिरायला आलेले असतात. त्यामुळे ते जास्त खर्च करत नाहीत.
ब्रिटिश पर्यटकांचे गोव्यात सरासरी १४ रात्री गोव्यात वास्तव्य असते. ब्रिटिश पर्यटक भारतात आले की, एकाच ठिकाणी किंवा एकाच हॉटेलात राहतात. खरा आनंद लुटण्यासाठी येणारे हे पर्यटक रिलॅक्स मूडमध्ये आपली सुट्टी येथे मजेत घालवत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते खर्चही करीत असतात त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना याचा बराच लाभ होत असतो.