भाजप सरकारने भाऊंच्या समाधीलाही लावला चुना; आपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:10 PM2024-08-12T18:10:41+5:302024-08-12T18:10:55+5:30
साेमवारी आपचे नेते ॲड. अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, ॲड. सुरेल तिळवे यांनी भाऊंना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली.
पणजी: भाजप सरकार हे चुना लावण्यात हुशार आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला तो चुना लावून लपविण्यात आला. स्मार्ट सिटीसाठी हजारो कोटी खर्च करुनही सरकारला ही समाधी दुरुस्त करता आली नाही, असा आराेप आपचे गाेवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केला. साेमवारी आपचे नेते ॲड. अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, ॲड. सुरेल तिळवे यांनी भाऊंना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली.
ॲड. अमित पालेकर म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर यांनी गाेव्याच्या विकासाचा पाया रचला राज्यभर शाळा बांधल्या आज त्यांची समाधी माेडकळीस आली आहे. पणजी राजधानीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले पण सरकारला यातील फक्त ५० लाख रुपये खर्च करुनही ही समाधी स्थळ दुरुस्त करता आली नाही. मुख्यमंत्री फक़्त जयंती आणि पुण्यतिथीला येथे येऊन श्रद्धांजली वाहतात. पण त्यांना ऐरव्ही येथे लक्ष द्यायला वेळ नाही. आजही मुख्यमंत्री फक़्त काही मिनिटांसाठी आले व श्रद्धांजली वाहिली. सरकारने येत्या १२ मार्च भाऊसाहेबांच्या जयंतीपूर्वी हे समाधी स्थळ दुरुस्त केले नाही तर पुढच्या वेळी मुख्यमंत्र्यांना येथे श्रद्धांजली वाहायला दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
ॲड. सुरेल तिळवे म्हणाले, भाऊसाहेबांनी मगाे पक्षातर्फे अनेक विकास कामे केली होती. आता मगाेचे अध्यक्ष व सर्वेसर्वा हे सुदिन ढवळीकर आहेत. ते या पक्षाच्या नावाने राजकारण करत आहेत आणि स्वताचा विकास करत आहेत. ढवळीकरांना मगोचे तसेच भाऊसाहेबांचे काहीच पडलेली नही. त्यांनी फक्त या पक्षाच्या नावाने मंत्री पदाचा आस्वाद घेतला. एवढी वर्षे मंत्र राहूनही त्यांनी भाऊंसाठी काहीच केले नाही.