दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून महिला उमेदवाराचा शोध सुरू
By किशोर कुबल | Published: March 4, 2024 03:45 PM2024-03-04T15:45:46+5:302024-03-04T15:46:09+5:30
आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांनी याआधीच आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्याने त्यांची नावे पाठवली नव्हती.
पणजी : 'दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने महिला उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. कदाचित महिला उमेदवार केडरमधील किंवा भाजप हितचिंतकही असू शकेल. निवडून येण्याची क्षमता हाच निकष असेल'., असे कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की,' भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाने महिला उमेदवार शोधा,असे सांगितल्याने कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर आम्ही चर्चा केली. यापूर्वी आम्ही नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर व दामू नाईक अशी तीन नावे दक्षिण गोव्यातून पाठवलेली आहेत. कोणाचीही नावे केंद्रीय संसदीय मंडळाने अजून फेटाळलेली नाहीत. आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांनी याआधीच आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्याने त्यांची नावे पाठवली नव्हती.
मुख्यमंत्री म्हणाले की, महिला उमेदवारांची नावे सुचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपचे पदाधिकारी, आमदार, मंत्री यांच्याशी चर्चा करून नावे पाठवली जातील. उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीतही जाहीर होऊ शकतो. कारण ही प्रक्रिया दीर्घ स्वरूपाची आहे. आमच्यासाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकणे हाच उमेदवार निवडीचा निकष असणार आहे.' छाननी समितीकडून नावे केंद्रीय संसदीय मंडळाकडे जातील व तेथूनच उमेदवार जाहीर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.