दाबोळी विमानतळाबाहेर आली ‘द बर्निंग रिक्षा’
By पंकज शेट्ये | Published: March 6, 2024 08:15 PM2024-03-06T20:15:16+5:302024-03-06T20:16:14+5:30
दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेरील महामार्गावरून जाणाऱ्या एका खाली मालवाहू रिक्षेला बुधवारी (दि.६) अकस्मात आग लागली.
वास्को: दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेरील महामार्गावरून जाणाऱ्या एका खाली मालवाहू रिक्षेला बुधवारी (दि.६) अकस्मात आग लागली. आग लागल्याचे दाबोळी विमानतळाच्या परिसरात असलेल्यांना दिसून येताच त्यांनी रिक्षेवर पाण्याचे फव्वारे मारून आग आटोक्यात आणण्याच्या कामाला सुरवात केली. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावर पोचून पाण्याचे फव्वारे मारून रिक्षेला लागलेली आग आटोक्यात आणली.
वास्को अग्निशामक दलातील सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार बुधवारी संध्याकाळी ५.१५ वाजता ती घटना घडली. दाबोळी विमानतळा बाहेरील महामार्गावरून एक खाली मालवाहू रिक्षा (जीए ०६ टी २७७७) जात होती.
ती रिक्षा जेव्हा दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या बाहेरील महामार्गाच्या परिसरात पोचली त्यावेळी रिक्षेला आग लागल्याचे चालकाला दिसून आले. त्यांने त्वरित स्व:ताचा जीव वाचवण्यासाठी रिक्षा महामार्गावरच थांबवून रिक्षा तेथेच सोडून तो दूर पळून गेला. त्यानंतर रिक्षाने मोठा पेट घेतल्याचे विमानतळ परिसरात असलेल्यांना दिसून येताच त्यांनी त्वरित पाण्याचे फव्वारे रिक्षेवर मारायला सुरवात केली. वास्को अग्निशामक दलाला घटनेची माहीती मिळताच त्यांच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पाण्याचे फव्वारे मारून रिक्षेला लागलेली आग आटोक्यात आणली. रिक्षेला आग लागलेल्या घटनेत सुदैवाने कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहीती प्राप्त झाली. आग लागलेली ती मालवाहू रिक्षा राकेश सिंग यांच्या मालकीची असल्याची माहीती अग्निशामक दलातील सूत्रांकडून मिळाली. आग लागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसलेतरी ‘शोर्ट सरकीट’ मुळे ती आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.