पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
By पंकज शेट्ये | Published: April 25, 2024 05:12 PM2024-04-25T17:12:13+5:302024-04-25T17:12:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली.
पंकज शेट्ये, वास्को: शनिवारी (दि.२७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत उपस्थित राहून त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारो गोमंतकीय उत्सुक्त आहेत. शनिवारी होणार असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेत ५० हजाराहून जास्त गोमंतकीय उपस्थित असणार असल्याचा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या स्थळी उपस्थिती लावून सभेची तयारी कशी होत आहे त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास, दक्षिण गोवा माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि इतर भाजप नेते - कार्यकर्ते उपस्थित होते. पाहणीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी २७ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यातील भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराच्या जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहीती दिली.
त्या सभेच्या तयारीचे काम कुठे पोचले आहे त्याची पाणी करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. सभा मुरगाव तालुक्यात होत असल्याने सभेच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या मंत्री माविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर आणि इतर भाजप नेत्यांवर सोपवण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. हजारो गोमंतकीय सभेला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक्त असून सभेत दक्षिण आणि उत्तर गोव्यातून मिळून ५० हजार गोमंतकीय उपस्थित असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेचा प्रभाव एकदम मोठा होणार असून त्याचा दक्षिण आणि उत्तर गोव्यातील भाजप उमेदवारांना मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.