प्रजासत्ताक दिनी क्रांतिवीर दीपाजी यांच्या क्रांतीला मुख्यमंत्री देणार मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:47 PM2024-01-24T17:47:56+5:302024-01-24T17:48:37+5:30
या कार्यक्रमास किल्यावर जाण्यासाठी बेतकेकर वाडा नाणूस येथून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.
वाळपई : क्रांतिवीर दिपाजी राणे यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीजांविरोधात सत्तरी तालुक्यातील रयतेला सोबत घेऊन नाणूस किल्याच्या साक्षीने गोवा स्वातंत्र्य संग्रामातील पहिली सशत्र क्रांती केली. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास सवर्धन समितीतर्फे नाणूस किल्ल्यावर २६ रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. या क्रांतीला राज्य सरकारने मान्यता देऊन गेल्या वर्षापासून क्रांतिवीर दीपाजी राणे यांना नाणूस किल्ल्यावर मानवंदना दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्यानुसार येत्या शुक्रवारी, दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री सावंत हे नाणूस किल्यावर उपस्थित राहून मानवंदना देणार आहेत. या कार्यक्रमास किल्यावर जाण्यासाठी बेतकेकर वाडा नाणूस येथून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.
याबाबत सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक, ॲड. शिवाजी देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री सावंत यांनी क्रांतिवीर दीपाजी राणे आणि नाणूस किल्ला याविषयी सुरुवातीपासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सरकार दरवर्षी किल्ल्यावर मानवंदना दिली जाते. सावंत यांनी आमदार असताना दीपाजी राणे यांचे नाव वाळपईच्या सरकारी इस्पितळास द्यावे यासाठी विधानसभेत ठराव संमत करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यांच्याच प्रयत्नामुळे क्रांतिवीर राणे, दादा राणे यांसह तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे चलचित्र राज्य सरकारने हीरक महोत्सवी वर्षात सर्वांसमोर आणले. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी सुरवातीपासूनच नाणूस किल्ला संवर्धन मोहिमेस सहकार्य केले आहे.
देसाई म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समितीच्या मोहिमेमुळे क्रांतीवीर दीपाजी राणेंचे कार्य उजेडात आले आहे. त्यांच्या इतिहासावर राष्ट्रीय स्तरावर वेबिनारही सादर केला आहे. किल्ल्याचा पर्यावरणदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. किल्ल्यावर त्यांचे स्मारक बांधून विकास केला जाऊ शकतो.
दरम्यान, क्रांतिवीर राणे यांचे पणतू दीपाजी राणे यांनी सांगितले की सरकारने सर्व प्रकारचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून नाणूस किल्याची जागा ताब्यात घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
फोटो : नाणूस किल्ला व दीपाजी राणे