लोखंड गंजल्यामुळे कला अकादमीचे बांधकाम कोसळले! अहवालात कारण आलं समोर
By वासुदेव.पागी | Published: August 10, 2023 07:50 PM2023-08-10T19:50:56+5:302023-08-10T19:51:06+5:30
आयआयटी मुंबईकडून अहवाल सरकारला सादर
वासुदेव पागी, पणजी: कला अकादमीच्या बांधकामातील लोखंड गंजून कमजोर झाले होते, आणि त्यामुळेच ते बांधकाम कोसळले असा निष्कर्ष आयआयटी तपासातून आला आहे. आयआयटीचा तपास अहवाल मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावत यानी विधानसभेत सादर केला. आयआयटी मुंबईकडून कला अकादमीच्या पावसात कोसळलेल्या बांधकामाचा अभ्यास सुरू होता. या अभ्यासाचा अहवाल आयआयटीकडून सरकारला सादर करण्यात आला असून तो विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी वाचूनही दाखविला.
लोखंड गंजून कमजोर झाल्यामुळेच बांधकाम अशक्त झाले. विशेषत: मध्यभागी या बांधकामाला उभे राहण्यासाठी कशाचाही आधार नव्हता. त्यामुळे ते कोसळले असे म्हटले आहे. या बांधकामासाठी वॉटरप्रुफिंग केले होते असेही अहवालात म्हटले आहे. जुने वॉटरप्रुफिंग काढून न टाकताच नवीन वॉटरप्रुफिंग करण्यात आल्याचाही दावा अहवालात फेटाळला आहे. या अहवालानुसार जुने वॉटरप्रुफिंग काढून टाकूनच नवीन वॉटरप्रुफिंग करण्यात आले होते. त्यामुळे बांधकामात पाणी शिरून पडले म्हणण्यास वाव राहिला नाही. परंतु लोखंड कमजोर झाल्यामुळेच पडले असे आता म्हणावे लागेल.कला अकादमीच्या कोसळलेल्या बांधकामाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्याच्या पहिल्याच दिवशी गदारोळ करून कामकाज रोखून धरले होते. या प्रकरणात चौकशीची मागणी केली होती. यामुळे सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले होते.
श्वेतपत्रिका नंतर कला अकादमीच्या बांधकामाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुंबई आयआयटीचा अहवाल विधानसभेत सादर केला असला तरी या संदर्भात विरोधकांचे प्रश्न संपलेले नाहीत. या प्रकरणात श्वेत पत्रिका जारी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. श्वेतपत्रिका जारी केली जाणार आहे, परंतु त्यासाठी अजून दिल्ली आयआयटीच्या स्ट्रक्चरल स्टबिलीटी संबंधीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत सरकार आहे. हा अहवाल मिळाल्यावर श्वेतपत्रिका जारी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले