त्या' कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होणार - मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Published: November 10, 2023 01:36 PM2023-11-10T13:36:44+5:302023-11-10T13:37:12+5:30
दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंबित कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
किशोर कुबल
पणजी : दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंबित कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी सायंकाळी उशिरा पणजीहून वाळपईकडे निघालेल्या जीए ०३ एक्स - ०५१५ क्रमांकाच्या बसचा चालक एल्विस रॉड्रिग्ज याने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशाचा जीव धोक्यात घातला. जुने गोवें परिसरात ही घटना घडली. मद्यधुंद चालकाने एका दुचाकीलाही धडक दिली. याप्रकरणी जुने गोवें पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. गुरुवारी रात्री त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना या घटनेविषयी विचारले असता ते म्हणाले की, 'असे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दारू पिऊन वाहन चालवण्याविरुद्ध कडक कारवाई चालूच राहील.'
फेरीबोट तिकीटवाढ अधिसूचना लवकरच मागे : मुख्यमंत्री
फेरीबोट तिकीटवाढ अधिसूचना लवकरच मागे घेतली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका प्रश्नावर सांगितले. दुचाक्यांना लागू केलेले तिकीट तसेच भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झालेला आहे. फक्त अधिसूचना मागे घ्यायचे सोपस्कार पूर्ण करणे बाकी आहे.