जमाना मोबाइल पत्रकारितेचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:43 AM2023-10-27T11:43:29+5:302023-10-27T11:43:58+5:30
स्मार्ट फोनमुळेच तर आज पत्रकारही स्मार्ट बनले आहेत आणि जग तर त्यांच्या मुठीत येऊ लागले आहे. आजच्या पत्रकारितेची ती गरज बनली आहे.
वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार
मागील काही वर्षांपासून आम्ही सगळेच नव्या डिजिटल युगात वावरत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अजून नव्या पर्वात पाय ठेवताना डिजिटल युगाने अन्य अनेक क्षेत्रांबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रालाही कसे पूर्णपणे झाकोळून टाकले आहे, याचा विचार करायला लागलो तर तब्बल ५४ वर्षांआधी आजच्याच दिवशी पत्रकारितेत मी पहिले पाऊल टाकले तेव्हापासूनच्या उण्यापुऱ्या पाच- साडेपाच दशकांचा पत्रकारितेतील माझा प्रवास
डोळ्यांसमोर तरळतो.
डिजिटल युगाने पत्रकारितेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या आजच्या युवा पिढीला चमत्कारी म्हणता येतील, अशा अनेक वस्तू दिल्या आहेत, ते पाहता आमची पिढी कदाचित तेव्हा या बदलाची साधी कल्पनाही करू शकत नव्हती. पत्रकारितेत अजून जो बदल होताना आम्ही पाहत आहोत त्याचा विचार केल्यास आमच्या पिढीतील पत्रकारांना आपण एक स्वप्नच पाहत आहोत, असे वाटू लागले तर नवल नाही. डिजिटल युगाने आम्हा पत्रकारांना ज्या काही चमत्कारिक गोष्टी दिल्या त्यात अर्थातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट फोन. आमच्या सगळ्यांच्याच जीवनात स्मार्ट फोन एक प्रमुख आणि महत्त्वाचा हिस्सा बनून राहिला आहे. जग अजून कितीही बदलले तरी पत्रकारितेतील स्मार्ट फोनची जागा कोणी हिरावून घेऊ शकेल, असे वाटत नाही. आजचा जमाना मोबाइल पत्रकारितेचा असून सध्या तरी त्यापासून सुटका होण्याची आशा बाळगता येणार नाही.
बरोबर ५४ वर्षांआधी पत्रकारितेच्या त्यावेळच्या मर्यादित अशा दालनात मी पाऊल ठेवले तेव्हाचे जग आठवताना कार्यालयातील प्रेस ट्रस्ट आणि समाचार भारती ही दोन टेलिप्रिंटर मशीन्स म्हणजेच दैनिकाचे प्राण होती. त्या प्राणवायूवरच दैनंदिन व्यवहार प्रामुख्याने चालायचा.
केवळ चारपानी दैनिकाची छपाई करताना जो आटापिटा त्यावेळी करायला लागायचा तो पाहता पुढील पाचेक दशकात तंत्रज्ञानाने घेतलेल्या उत्तुंग झेपेमुळे तो पोरखेळच होता, असे आता वाटते. छपाई यंत्रावर चपात्या लाटल्याप्रमाणे पूर्ण आकाराचा अंक प्रथम एका बाजूने तर नंतर दुसऱ्या बाजूने छपाई करावा लागत असे आणि त्यानंतर त्याची घडी करूनच वितरणासाठी पार्सले तयार होत. त्या ऐतिहासिक प्रक्रियेचा मी एक साक्षीदार होतो. हे सांगताना मी त्या काळात पोहोचतो आणि आजच्या पत्रकारितेच्या जगाशी त्याची तुलना करण्याचा मोह आवरत नाही.
माझा पत्रकारितेतील प्रवेश अपघाती होता हे खरे असले तरी पत्रकार बनण्यासाठी त्यावेळी कोणी स्वत: होऊन पुढे येणे म्हणजे एक आश्चर्यच होते; पण आज मोबाइल पत्रकारितेत प्रतिभावान युवा पत्रकारांसाठी नवनवीन दालने खुली होत आहेत. आमच्या हातात साधा मोबाइल फोन आला तोपर्यंत पत्रकारितेत अडीच तीन दशके घालवली होती आणि खऱ्या अर्थाने ती श्रमिक पत्रकारिता होती, असे मी म्हणेन.
श्रमिक पत्रकारितेची व्याख्या बहुधा त्या काळात पत्रकारिता करणाऱ्यांच्या मार्गातील असंख्य अडचणींचा विचार करूनच निश्चित केली असावी. आजच्या डिजिटल युगात मोबाइलवर प्रचंड गतीने धडकणाऱ्या बातम्यांमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडून आली असून मोबाइल पत्रकारितेचे एक वेगळेच जग तयार झाल्याचे दिसते. अवघ्या आठ- दहा वर्षांपूर्वी आलेल्या स्मार्टफोनने आज पत्रकारितेत मानाचे स्थान पटकावले आहे.
केवळ वीस बावीस वर्षांपूर्वी डिजिटल पत्रकारितेची मुहूर्तमेढ देशात खऱ्या अर्थाने रोवली गेली; पण या अल्प काळात एखादा स्मार्ट फोनच न्यूज चॅनल म्हणून आपल्यासमोर येतो तेव्हा मोबाइल पत्रकारितेने घेतलेली प्रचंड झेप लक्षात येते. प्रत्येक पत्रकाराच्या हातात आज स्मार्ट फोन दिसतो. आजच्या पत्रकारितेची ती गरज बनली आहे. स्मार्ट फोनमुळेच तर आज पत्रकारही स्मार्ट बनले आहेत आणि जग तर त्यांच्या मुठीत येऊ लागले आहे. पन्नास पंचावन्न वर्षांआधी पत्रकारितेत पाय ठेवणाऱ्या आमच्यासारख्यांसाठीही हा बदल सुखावणारा आहे यात वाद नाही.
स्मार्ट मोबाइल आणि गुगलच्या या युगातील पत्रकारितेला एक वेगळाच आयाम मिळाला असून त्याच्या अधीन होण्याव्यतिरिक्त आज अन्य पर्यायच उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. हाताने बातम्या लिहिणाऱ्या किंवा टाइपरायटरवर इंग्रजीतून बातम्या बडवणाऱ्या काळाचे आम्ही प्रतिनिधी असलो तरी मोबाइल पत्रकारितेने आज जी जागा व्यापून टाकली आहे, ती पहाता पाच- साडेपाच दशकात एकूण पत्रकारितेत झालेल्या बदलाचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून घेतलेला अनुभवही मनाला खूप खूप समाधान देणारा आहे. कंपोजिंग म्हणजे हाताने अक्षराचे खिळे जुळवण्याच्या तंत्रज्ञानापासून डिजिटल युगातील मोबाइल पत्रकारिता अशा क्रांतिकारक बदलापर्यंतचा प्रवास उलगडताना अनेक आठवणी मनाला स्पर्श करून जातात. मोबाइल पत्रकार ही नवी जमात आज या क्षेत्रात रूढ होऊ लागली असून आपला असा खास ठसा या पत्रकारांनी उमटवलेला आम्ही पाहतो, तेव्हा मोबाइल पत्रकारितेला अजून बरे दिवस येतील, अशी आशा या डिजिटल युगातही बाळगता येईल.