राज्यातील सर्जनशील समुदायास एकत्र आणण्याच्या उद्देशाने फर्स्ट फ्रायडेजची पाचवी बैठक संपन्न
By समीर नाईक | Published: May 13, 2024 03:12 PM2024-05-13T15:12:07+5:302024-05-13T15:12:31+5:30
कार्यक्रमादरम्यान, क्रिएटीव्ह कम्युनिटी ऑफ़ गोवा (सीसीजी) समुदायाचे सदस्य रॉय यांनी वेबसाइटच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण केले.
पणजी: फर्स्ट फ्रायडेजची पाचवी बैठक नुकतीच पणजीच्या एमओज कॅफे येथे यशस्वीरित्या पार पडली. राज्यातील सर्जनशील समुदायाला एकत्र आणणे, हा या बैठकीचा मुख्य ध्येय होता. स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल (एसआयटीपीसी), माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग, आणि एडीआय गोवा यांच्या भागीदारीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्जनशील व्यक्तींना जोडण्यासाठी, सहयोग निर्माण करण्यासाठी आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक काम करते. उत्तम संपर्क आणि कौशल्याची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने, क्रिएटीव्ह कम्युनिटी ऑफ़ गोवाने (सिसिजी) गोव्यातील विविध प्रकारच्या सर्जनशील प्रतिभांना एकत्र आणले. वास्तुविशारद, कलाकार, कारागीर, डिझाइनर आणि विविध सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिक कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, नेटवर्कसाठी आणि संभाव्य सहकार्यांचा शोध घेण्यासाठी एकत्र आले.
कार्यक्रमादरम्यान, क्रिएटीव्ह कम्युनिटी ऑफ़ गोवा (सीसीजी) समुदायाचे सदस्य रॉय यांनी वेबसाइटच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण केले. ज्यामध्ये 'डिस्कव्हर अवर कम्युनिटी', 'फर्स्ट फ्रायडे', 'डिझाइन पॉलिसी', 'रिसोर्सेस अँड सपोर्ट', 'डिझाइन इन्टरव्हेन्शन', ’व्हॉट इज हॅपनिंग इन गोवा’, आणि 'कम्युनिटी बोर्ड' असे विभाग आहेत. विशेष म्हणजे, ‘सदस्यांची निर्देशिका’ या विभागाकडे लक्षणीय लक्ष वेधले गेले, जे डिझाइनरना नोंदणीकृत, वर्गीकृत आणि प्रादेशिक पर्यायांद्वारे राज्यातील इतर सर्जनशील व्यक्तींशी जोडण्यास अनुमती देते.
बैठकीस उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी परस्परांशी संवाद साधला. काही महत्वाच्या सूचना देखील केल्या. त्यांच्या सक्रिय सहभागाने समुदायाच्या वाढीसाठी आणि नाविन्यपूर्णतेची बांधिलकी दिसून आली.
स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस. प्रशांत यांनी सहभागींना पुढील दशकासाठी गोव्याचे भवितव्य आणि त्याच्या लक्ष्यित क्षेत्रांची कल्पना करण्यासाठी प्रोत्साहित केले, विशेषत: डिझाइन कॅपिटल म्हणून गोव्याची ओळख निर्माण करण्यासाठी सर्जनशील अभ्यासकांच्या भूमिकेवर जोर दिला.