जी २० साठी विदेशी प्रतिनिधींचा पहिला चमू गोव्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:58 PM2023-04-15T19:58:06+5:302023-04-15T19:58:35+5:30
या गटात फ्रँकोइस व्हॅनी, स्टीफन मर्फी, डिलन पल्व्हर, स्टेफनी सेडॉक्स, ॲलन लॅब्रिक, डेरिक मुनीने आणि स्वित्झर्लंडमधील गॅरेट मेहल तसेच अमेरिकेतील एलिस अँथनी आणि स्टीव्हन पोस्नॅक यांचा समावेश आहे.
पणजी - गोव्यात १७ ते १९ एप्रील दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या हेल्थ वर्किंग ग्रुप जी २० बैठकीत सहभागी होण्यासाठी अंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा ओघ सुरू झाला आहे. अंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट शनिवारी दाबोळी विमानतळावर दाखल झाला. या गटात फ्रँकोइस व्हॅनी, स्टीफन मर्फी, डिलन पल्व्हर, स्टेफनी सेडॉक्स, ॲलन लॅब्रिक, डेरिक मुनीने आणि स्वित्झर्लंडमधील गॅरेट मेहल तसेच अमेरिकेतील एलिस अँथनी आणि स्टीव्हन पोस्नॅक यांचा समावेश आहे.
प्रतिनिधींचे संगित वाजवून स्वागत करण्यात आले तसेच सीआयएसएफ जवानांकडून त्यांना विश्रामगृहात नेण्यात आले. भारतातील प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी कलाकारांचा एक चमू विमानतळावर तत्पर ठेवण्यात आला आहे. तसेच रेडकार्पेटचा मानही त्यांना देण्यात आला आहे. बांबोळी येथील एका बड्या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढील काही दिवसांत राज्यातील दोन्ही विमानतळावरून प्रतिनिधींचा ओघ सुरू होणार आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन या जी २० चे सदस्य आहेत.