...आणि नेत्यांच्या भेटीत ठरला कोकणसाठी 'फॉर्म्युला'; राणे-फडणवीस अर्धा तास गुप्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 07:12 AM2024-10-24T07:12:41+5:302024-10-24T07:16:32+5:30
मंत्री विश्वजित राणे यांनी बैठकीबाबत माहिती उघड करण्यास नकार दिला. देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यानिमित्ताने श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन गणेशाची कृपा व आशीर्वाद सतत लाभू दे, अशी मनोमन प्रार्थना केल्याचे 'लोकमत'ला सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोकणपट्ट्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये प्रतिकूल असलेली स्थिती भाजपसाठी कशी अनुकूल करावी, याबाबत गोव्याचे मंत्री विश्वजित राणे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'गुप्त' स्वरुपाची चर्चा झाली. गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काही मतदारसंघांत जो फॉर्म्युला फडणवीस यांनी विश्वजित राणे यांच्या मदतीने वापरला होता, तोच फॉर्म्युला आता सिंधुदुर्गमध्ये किंवा एकूणच कोकणपट्ट्यात वापरला जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात एक महिना तळ ठोकून होते. गोव्याची जबाबदारी त्यावेळी फडणवीस यांच्याकडे सोपवली गेली होती. फडणवीस यांनी काही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची व काही मतदारसंघांमध्ये मंत्री विश्वजित राणे यांची मदत त्यावेळी घेतली होती. आमदार मायकल लोबो वगैरे भाजपमधून बाहेर गेले होते. त्या काळात रोहन खंवटे वगैरेंना भाजपमध्ये आणण्याचे काम फडणवीस यांनी राणे व इतरांच्या माध्यमातून केले होते. तसेच गोव्यात काही अपक्ष व अन्य पक्षीय उमेदवारांनाही अप्रत्यक्षरीत्या भाजपने पाठिंबा दिला होता. काहीसा असाच फॉर्म्युला आता कोकणात वापरला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
तब्बल अर्धा तास 'गुप्त' बैठक
दरम्यान, मंत्री विश्वजित यांनी बैठकीबाबत माहिती उघड करण्यास नकार दिला. येत्या २५ रोजी फडणवीस हे उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यानिमित्ताने आपण श्री गणेशाची मूर्ती फडणवीस यांना भेट देऊन गणेशाची कृपा व आशीर्वाद सतत फडणवीस यांना लाभू दे, अशी मनोमन प्रार्थना केल्याचे मंत्री राणे यांनी 'लोकमत'ला सांगितले.