चारचाकी कुंपणाला धडकली, मग रस्त्यावर उलटली अन् नंतर टेम्पोला धडकली!
By पंकज शेट्ये | Published: March 16, 2024 09:29 PM2024-03-16T21:29:27+5:302024-03-16T21:30:01+5:30
हार्बर - सडा येथील अपघातात दोन तरुण जखमी
वास्को: भरधाव वेगाने चारचाकी चालवून जाताना चालकाचा ‘स्टीअरींग’ वरील ताबा सुटून हार्बर, सडा येथे झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. चिखली येथील रोहीत महातो भरधाव वेगाने चारचाकी चालवत हार्बर चढाव काढताना त्याचा वाहनावरील ताबा सुटून चारचाकी एका कुंपणाला धडकून नंतर रस्त्यावर उलटून फरफटत जात तेथे असलेल्या टेम्पोला धडकली. त्या अपघातात चारचाकी चालक रोहीत आणि त्याच्याबरोबर असलेला गुरूनाथ चव्हाण (रा: चिखली) जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार चालू आहेत.
मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.१६) सकाळी ७.१० च्या सुमारास तो अपघात घडला. चिखली येथे राहणारा रोहीत महातो व्हॅगनार चारचाकीत (जीए ०६ इ ००७१) गुरूनाथ चव्हाण नामक तरुणाला घेऊन (दोघेही सुमारे २५ वर्षांचे तरुण) हार्बर येथून सडा परिसराच्या दिशेने जात होता. रोहीत भरधाव वेगाने चारचाकी चालवत हार्बर चढाव काढताना अचानक त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. रोहीतचा ताबा सुटल्यानंतर चारचाकीने तेथील कुंपणाला धडक देऊन चारचाकी रस्त्यावर उलटली. एक चारचाकी उलटून आपल्या वाहनाच्या दिशेने येत असल्याचे सडा येथून हार्बर जाण्यासाठी जात असलेल्या टेम्पो चालकाला दिसताच त्यांनी त्वरित ब्रेक मारून टेम्पो (जीए ०६ टी ४१७५) थांबविला. उलटलेली चारचाकी फरफटत जाऊन त्या टेम्पोला धडकली. टेम्पो चालकाने वेळीच वाहन थांबवल्याने तेथे होणारा पुढचा अनर्थ टळला. अपघातात रोहीत आणि गुरूनाथ जखमी झाल्याने त्यांना चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. नंतर तेथून त्यांना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मुरगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक परेश फळदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला. मुरगाव पोलीस अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.