मुंबई मार्गे ड्रग्स येणार असल्याची गोवा पोलिसांना होती माहिती
By वासुदेव.पागी | Published: October 14, 2023 01:24 PM2023-10-14T13:24:21+5:302023-10-14T13:24:31+5:30
गोव्यात मुंबई मार्गे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थचा कन्साईन्मेंट गोव्यात पुरविला जाणार असल्याची माहिती गोवा अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती.
पणजी: गोव्यात मुंबई मार्गे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थचा कन्साईन्मेंट गोव्यात पुरविला जाणार असल्याची माहिती गोवा अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती. तो मुंबईतून सुटला जरी असता तरी गोवा पोलीस तो पकडण्यासाठी सतर्क आणि सज्ज होते असे गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई शाखेने मुंबईत १३५ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ शुक्रवारी जप्त केला. हा अंमली पदार्थ गोव्यासह इतर काही राज्यात पुरवठा केला जाणार होता. अधीक्षक सिल्वा यांना एनसीबीच्या या कारवाईविषयी विचारले असता ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा पुरवठा मुंबई मार्गे होणार असल्याचे संकेत गोवा पोलिसांनाही मिळाले होती आणि एनसीबीलाही मिळाले होते. गोव्यात अंमली पदार्थ विरोदी विभाग सतर्क होता. सर्व यंत्रणेही सज्ज करण्यात आली होती. मुंबईतून हा ड्रग्स निसटला असता तरीही गोव्यात येणारा माल पकडला गेला असता असे ते म्हणाले.
दरम्यान, गोव्यात नेमका कुठे हा अंमली पदार्थ पुरविला जाणार होता याची माहिती मात्र गोवा पोलिसांना नव्हती. एका ठिकाणी नव्हे तर एकपेक्षा अधिक ठिकाणावर त्याचा पुरवठा केला जाणार होता असा अंदाज असल्याचेही सिल्वा यानी सांगितले.
मुंबईत पकडला गेलेला अंमली पदार्थ गोव्यासह बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद येथे पाठवला जाणार होता. या प्रकरणी तीन विदेशी नागरिक व दोन महिलांसह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ तयार करणाऱ्या दोन मोठ्या प्रयोगशाळाही उध्वस्त करण्यात आल्या, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.