हातावर राहिले हेल्मेट आणि युवकाने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 05:09 PM2024-01-01T17:09:52+5:302024-01-01T17:10:10+5:30
घरातून निघताना त्याने हेल्मेट डोक्यावर घालायच्याऐवजी हातात घेतले होते.
फोंडा : भोम येथील महानंदू विद्यालयाच्या उतरणीवर असलेल्या एका विजेच्या खांबाला धडक बसल्याने स्वयं अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू होण्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
सविस्तर वृत्तानुसार मूळ नेपाळ येथील पण सध्या मुस्लिमवाडा भोम येथे राहणारा प्रीतम रोमन बोरा (वय ३१) हा युवक ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या ठिकाणी काम करण्याच्या निमित्ताने आपली स्कूटर (जीए - ०५- के- २७८३) घेऊन घरातून बाहेर पडला होता. घरातून निघताना त्याने हेल्मेट डोक्यावर घालायच्याऐवजी हातात घेतले होते. महानंदू हायस्कूलच्या मागे असलेल्या उतरणीवर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्यावर दुचाकीची सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडक बसली. ह्या धडकेत त्याचे डोके थेट विजेच्या खांबावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या स्कूटरची मोडतोड झाली आहे. याचाच अर्थ तो भरधाव वेगात जात असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
या अपघाताची माहिती मिळताच म्हार्दोळ पोलिस स्थानकच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास चालू आहे.