सूचना सेठच्या पतीची चौकशी सुरु
By काशिराम म्हांबरे | Published: January 13, 2024 04:37 PM2024-01-13T16:37:22+5:302024-01-13T16:38:16+5:30
सूचनाला आपण मुलाला भेटणे पसंद नव्हते. त्यामुळे ती आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती अशी माहिती व्यंकटरमण यांनी पोलिसांना दिली आहे.
म्हापसा: सिकेरी येथे आपल्या कोवळ्या ४ वर्षीय मुलाची हत्या केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सूचना सेठ हिचा पती व्यंकटरमण यांनी त्याचे पत्नी सूचना सोबत लग्नानंतरच्या संबंधाची माहिती कळंगुट पोलिसांना दिली. सूचनाला आपण मुलाला भेटणे पसंद नव्हते. त्यामुळे ती आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती अशी माहिती व्यंकटरमण यांनी पोलिसांना दिली आहे.
सूचनाचा पती व्यंकटरमण आज (शनिवारी) सकाळी आपल्या वकिलासोबत चौकशीसाठी कळंगुट पोलीस स्थानकावर दाखल झाला. त्याला या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी पाचारण केले होते. त्यानुसार तो आलेला. त्याच्या चौकशी अंती या प्रकरणातील तपासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या बºयाच गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी त्याची चौकशी करण्यास आरंभ केला. दोघांतील संबंधावर अनेक प्रश्न चौकशी दरम्यान त्याला विचारण्यात आले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सूचना आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती. न्यायालयाने व्यंकटरमणला दर रविवारी त्याच्या बाळाला भेटण्याची परवानगी दिलेली. मात्र सूचनामुळे आपण मागील ५ रविवार बाळाला भेटलो नाही असे त्यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले.
१८ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांचा विवाह झालेला. १४ आॅगस्ट २०१९ रोजी त्या मुलाचा जन्म झालेला. त्यानंतर २०२१ पासून सूचनाने पतीसोबत राहणे सोडून दिले होते. त्यानंतर घटस्पोटाची प्रक्रिया सुरु असताना बाळाचा ताबा कोणाकडे असावा असा प्रश्न निर्माण झालेला. मुलाच्या ताब्यावरून सुरु असलेल्या न्यायालयीन लढतीत यावर तोडगा म्हणून न्यायालयाने दर रविवारी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचेआदेश दिलेले.
पतीने आपला मानसीक तसेच शारीरिक छळ केल्याचा आरोपही सूचनाने व्यंकटरमण वर केला होता. ज्या दिवशी ही घटना घडलेली त्या दिवशी व्यंकटरमण इंडोनेशीयात होता. मुलाच्या हत्येनंतर त्याला भारतात बोलवून घेण्यात आले होते.