गोव्यातील खून प्रकरणात सूचना हिच्या न्यायालयीन कोठडीत २६ फेब्रुवारीपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 01:29 PM2024-02-13T13:29:27+5:302024-02-13T13:30:20+5:30
सूचनाच्या मानसिक आरोग्याची सिव्हील सर्जन किंवा वैद्यकीय मंडळाने तपासणी करावी अशी मागणी या याचिकेत तिच्या वडिलांनी केली आहे
पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी: आपल्या चार वर्षीय मुलाच्या खुनाचा आरोप असलेल्या सूचना सेठ हिच्या न्यायालयीन कोठडीत बाल न्यायालयाने २६ फेब्रुवारी पर्यंत वाढ केली आहे. सूचना हिच्यावर आपल्या मुलाचा कांदोळीतील एका हॉटेलात खून केल्याचा आरोप आहे. दरम्यान सूचना हिची मानसिक आरोग्याची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी करणारी याचिका तिच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने २१ फेब्रुवारी पर्यंत स्थगित केली आहे.
सूचनाच्या मानसिक आरोग्याची सिव्हील सर्जन किंवा वैद्यकीय मंडळाने तपासणी करावी अशी मागणी या याचिकेत तिच्या वडिलांनी केली आहे. कळंगुट पोलिसांनी त्याला न्यायालयात विराेध केला. पोलिसांनी यावेळी गोवा मनोरुग्ण उपचार इस्पितळ अर्थात आयपीएचबीच्या तज्ञ डाॅक्टरांनी २ फेब्रुवारी रोजी सूचना हिची केलेल्या मानसिक आरोग्य चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालात सूचना हिला कुठल्याही प्रकारचा गंभीर मानसिक आजार नाही. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे ती व्यवस्थित उत्तर देते. तिच्यात आत्महत्येचीही प्रवृती दिसून येत नसल्याचे या अहवालात नमूद केले आहे.