'त्या' जंगलचा राजा गेला, फासात अडकून बिबट्याचा मृत्यू
By आप्पा बुवा | Published: October 10, 2023 01:10 PM2023-10-10T13:10:44+5:302023-10-10T13:12:27+5:30
म्हार्दोळ ते मडकई औद्योगिक वसाहत ला जोडणाऱ्या रस्त्यावर एका बिबट्याचे दर्शन अधूनमधून घडायचे. काही दिवसांपूर्वी एक बिबट्या एका दुचाकीच्या मागे सुद्धा लागला होता.
फोंडा - मागच्या काही दिवसापासून सिमेंपायण म्हार्दोळ येथे अधूनमधून दिसत असलेला बिबट्या एका फासात अडकून मृत्यूमुखी होण्याची घटना घडली आहे.
म्हार्दोळ ते मडकई औद्योगिक वसाहत ला जोडणाऱ्या रस्त्यावर एका बिबट्याचे दर्शन अधूनमधून घडायचे. काही दिवसांपूर्वी एक बिबट्या एका दुचाकीच्या मागे सुद्धा लागला होता. त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती .मंगळवारी सकाळी सदरचा नर बिबट्या स्मशान भूमी जवळ एका फासात अडकून लोकांच्या लक्षात आले. या संदर्भात लगेचच वन खाते व पोलिसांना कळविण्यात आले. सदरचा बिबट्या फासात अडकल्याने जागीच मृत्युमुखी पडला होता.
वनखात्याने येऊन सदर बिबट्याला शवचिकित्सा करण्यासाठी फोंडा येथील पशुसंवर्धन खात्याच्या कार्यालयात घेऊन गेले. शवचीकित्सा झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येईल. त्याच बरोबर तो नेमका किती वर्षाचा होता हे सुद्धा स्पष्ट होईल.बिबट्या फासात अडकला आहे हे लक्षात येताच लोकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. परिणामी औद्योगिक वसाहत व मडकई ला जोडणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक जाम झाले. दोन्ही बाजूला वाहने अडकून पडली. बिबटा हा नर जातीचा असून तो आपले खाद्य शोधण्यासाठी कदाचित त्या बाजूला आला असेल व फासात अडकला असेल.
फास नक्की कुणासाठी?
वन खात्याच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार सदरचा फास हा बिबट्याला पकडण्यासाठी नाही तर कदाचित रानडुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आला असावा. जेथून रान डुक्कर जातो नेमके त्याच वाटेवरून बिबट्याची ये जा चालू असणार .परिणामी रान डुक्कर साठी लावलेल्या फासात अडकून तो मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे.
ह्या संदर्भात उपवननपाल जिस वरकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला व यापुढे जंगल परिसरामध्ये शोध मोहीम चालू ठेवण्यात येण्यार असल्याचे सांगितले. परिसरात बिबट्या वगैरे असल्याचे नजरेस येतात लोकांनी वन खात्याच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी. यापुढे जंगलात फिरणाऱ्या शिकाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाईल. असेही सांगितले. बिबट्या दृष्टीस पडण्याची व बिबट्या मृत्युमुखी होण्याची ही ह्या भागातली ही काही पहिलीच घटना नसून काही महिन्यापूर्वी असाच एक जखमी बिबट्या सदर परिसरातील एका गोठ्यात आढळून आला होता. वनखात्याने अथक प्रयत्नानंतर त्याला पकडले होते परंतु हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला होता.