दिवे लागले रे... दिवे लागले! म्हादईसाठी घरोघरी दिवे लागले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:03 PM2023-02-13T13:03:00+5:302023-02-13T13:03:51+5:30

अनेकांनी आपल्या घरांमध्ये म्हादईसाठी कलशपूजनसुद्धा केले.

the lights are on in houses in goa for mhadei river | दिवे लागले रे... दिवे लागले! म्हादईसाठी घरोघरी दिवे लागले...

दिवे लागले रे... दिवे लागले! म्हादईसाठी घरोघरी दिवे लागले...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्याची जीवनदायिनी म्हादईच्या रक्षणार्थ रविवारी संध्याकाळी 19.30 वाजता गोमंतकीयांनी घरोघरी पणती, मेणबत्ती, दिवे लावून म्हादईचा लढा आम्हीच जिंकू असा सरकारला म्हादईप्रश्नी कठोर संदेश दिला. यावेळी अनेकांनी आपल्या घरांमध्ये म्हादईसाठी कलशपूजनसुद्धा केले.

पणजी. म्हापसा, पेडणे तालुक्यातील पेडणे तालुक्यातील अनेक गावे, तसेच मांद्रे मतदारसंघातील गावांमध्ये आणि दक्षिण गोव्यातही अनेक गावांमध्ये पणती, मेणबत्ती, समई प्रज्वलित करून, कलश पूजन करून म्हादईच्या रक्षणाची हाक देण्यात आली. कर्नाटक सरकारकडून म्हादई नदी वळविण्याच्या प्रकाराला रोखण्यासाठी, म्हादईच्या रक्षणार्थ गोमंतकीयांनी घरोघरी पणती, मेणबत्ती, दिवे लावावे व म्हादईचा लढा अधिक बळकट करावा असे आवाहन 'सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा' संघटनेने केले होते. या आवाहनाला अनेकांनी पाठिंबा दिल्याचे पाहण्यास मिळाले. महत्त्वाचे म्हणजे केवळ सर्वसामान्य जनताच नव्हे, तर अनेक नेत्यांनीही यात सहभाग घेतला. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनीसुद्धा यात सहभाग घेतला.

म्हादईचे पाणी गोव्याकडेच राहू दे, कर्नाटककडे म्हादईचे पाणी वळवले जाऊ नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. पेडणे तालुक्यात अनेकांनी घरोघरी कलश पूजन करून आंदोलनाला पाठिंबा दिला. घरोघरी लावलेल्या पणत्या, मेणबत्ती, दिव्यांचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. म्हादईचा विषय हा संपूर्ण राज्याशी संबंधित असल्याने सर्वधर्मीय लोकांचा यात सहभाग दिसून आला. चिखली येथील चर्चचे फादर बोलमेक्स परेरा यांनी सकाळी चर्चमधील प्रार्थना सभेदरम्यान लोकांनी यात भाग घेऊन म्हादईच्या लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. सध्या गोवा सरकार म्हादईसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहे. आज, सोमवारी या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे अनेकांचे सुनावणीकडेही लक्ष लागून आहे. गोवा सरकारने राज्याची बाजू प्रखरपणे मांडावी अशी मागणी केली जात आहे.

१६ रोजी महाआरती 

'सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा च्यावतीने म्हादई बचावसाठी गुरुवारी, दि. २६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पणजी येथील पाटो पुलावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, म्हादई नदी वाचविण्याच्या आंदोलनाची धार वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

पणजीतही उत्स्फूर्त प्रतिसाद

पणजीतील बॉक दे व्हाक येथील झरीकडे जमून "सेव्ह म्हादई, सेव्ह गोवाने सर्वधर्मीय नागरिकांसोबत पणती, मेणबत्ती लावून म्हादईच्या रक्षणाचा संदेश दिला, पणती, मेणबत्तीचा दिया म्हादई वळवण्यासाठी कर्नाटकने रचलेला डाव उधळून लावेल. या आंदोलनाद्वारे कर्नाटक सरकारलासुध्दा स्पष्ट इशारा दिला जात असल्याचे यावेळी इतिहास अभ्यासक प्रजल साखरदांडे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनास पणजीवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,

म्हापशात मेणबत्ती फेरी

भारत माता की जय, आमची म्हादय आमकां जाय अशा घोषणा देत म्हापशातून म्हादईच्या बचावासाठी हातात कलश घेऊन मेणबत्ती फेरी काढली.

पेडणेत घरोघरी कलशपूजन

म्हादई नदी वाचवण्यासाठी पेडणे तालुक्यातील आणि मांद्रे मतदारसंघातील अनेक घराघरांत रविवारी कलशपूजन करण्यात आले. मेणबत्ती पणती लावून घरे प्रकाशमान करण्यात आली. यापूर्वी मांद्रे येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नागरिक, पर्यावरण प्रेमींची बैठक झाली होती. बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून जीवनदायिनी म्हादई नदीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी कलश पूजन, पणती मेणबत्ती लावावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरोघरी कलशपूजन केले. यात ज्येष्ठांबरोबरच मुले आणि ज्येष्ठ महिलांचाही समावेश होता. मांद्रे मतदारसंघातील काही गावांत हे चित्र दिसून आले. पेडणे तालुक्यातही काही गावात घरोघरी कलशपूजन केल्याचे दिसून आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: the lights are on in houses in goa for mhadei river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा