तिळारी'च्या कालव्यांचे लॉक झालेले गेट्स तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नांती उघडले

By किशोर कुबल | Published: December 27, 2023 01:22 PM2023-12-27T13:22:23+5:302023-12-27T13:22:48+5:30

पुण्याहून खास मागवलेल्या तंत्रज्ञांच्या पथकाने केली कामगिरी फत्ते

The locked gates of Tilari's canals were opened after twenty hours of tireless efforts | तिळारी'च्या कालव्यांचे लॉक झालेले गेट्स तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नांती उघडले

तिळारी'च्या कालव्यांचे लॉक झालेले गेट्स तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नांती उघडले

किशोर कुबल

पणजी : तिळारी धरणाच्या कालव्यांचे लॉक झालेले गेट्स पुण्याहून खास मागवलेल्या तंत्रज्ञांच्या पथकाने तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज सकाळी ६ सुमारास उघडून कामगिरी फत्ते केली. पर्वरी  जलशुद्धीकरण प्रकल्पाला उद्या गुरुवारी दुपारपर्यंत पाणी येईल असे सांगण्यात आले

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना ती माहिती दिली. ते म्हणाले की,' पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवले होते. पाच ते सहा तंत्रज्ञ गेले २० तास या गेटस्  उघडण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर आज सकाळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तिळारीचे पाणी आता वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले असून उद्या गुरुवारी दुपारपर्यंत पर्वरी येथील १० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला हे पाणी मिळेल'.

दोन्ही कालव्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतल्याने गेला महिनाभर पर्वरी पठार, साळगाव, कांदोळी भागातील लोकांची  पाण्यासाठी परफटचालली होती. डागडुजीचे काम २२ रोजी पूर्ण झाले परंतु धरणाच्या कालव्याच्या दोन्ही गेटस् लॉक झाल्याने पाणी सोडता आले नव्हते. पर्वरीतील १० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प बंदच होता. पर्वरी पठारासह आजूबाजूच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली होती.

 नाताळ, नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी गोव्यात आहे. त्यामुळे या दिवसात पाण्याची मागणी वाढलेली आहे. नेमकी याचवेळी पाण्याची समस्या निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

लॉक झालेल्या गेटस् उघडण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू होते. पाण्याचा सुमारे दोन हजार टन वजनाचा प्रेशर या दोन्ही गेटवर होता. त्यामुळे त्या खुल्या करणे कठीण काम बनले होते. पुणे येथील तंत्रज्ञांनी त्यावर मात केली.

दरम्यान, या गेट्स वापरात नसल्या की लॉक होण्याचे प्रकार याआधीही घडलेले आहेत. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला तिळारीचे रोज १३० एमएलडी पाणी दिले जाते. सध्या या प्रकल्पाला आमठाणे धरणातून तसेच साळ येथील शापोरा नदीतून पाणी पंपिंग करून घेत गरज भागवली जात होती.

तिळारी धरण पाणी प्रकल्प हा गोवा - महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पावर गोवा राज्याने ७० टक्के तर महाराष्ट्राने ३० टक्के खर्च केला आहे. पाण्याचे वाटपही याच प्रमाणात होत आहे.

Web Title: The locked gates of Tilari's canals were opened after twenty hours of tireless efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.