गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल
By किशोर कुबल | Published: March 21, 2024 04:18 PM2024-03-21T16:18:27+5:302024-03-21T16:19:38+5:30
तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही.
पणजी : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना गोव्यात म्हादईचा विषय विरोधकांनी तापवला आहे. म्हादईबाबत ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही?, असा सवाल आरजीने केला आहे. गोवा फॉरवर्डनेही या प्रश्नावर सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी नव्याने काम सुरु केले आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा विषय गाजत आहे.
आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हादईचे रक्षण करण्यासाठी भाजपने ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? असा प्रश्न करुन ‘सेव्ह म्हादई’ कुठे आहे? या चळवळीचे नेतृत्त्व करणारे कॉंग्रेसी नेते कुठे आहेत? असा प्रश्न केला असून कणकुंबी येथून जर मोर्चा काढला तर कॉंग्रेससोबत सहभागी होण्याची आमची तयारी आहे?, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकने मलप्रभा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी नाल्यावर बांधकाम सुरू केले आहे, अशी माहिती देताना सरदेसाई यांनी तेथे सुरू असलेल्या कामांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. सभागृह समितीची बैठक बोलावण्याची वारंवार विनंती करूनही सरकारने तसे करण्याची तसदी घेतली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
हा निवडणूक स्टंट -
दरम्यान, विरोधक उपस्थित करीत असलेला म्हादईचा विषय हा निवडणूक स्टंट असल्याचा दावा करीत दरवेळी निवडणुकीआधी विरोधी पक्ष हा विषय उकरुन काढतात, अशी टीक भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे.
तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही.