कवळे पंचायत क्षेत्रातील भंगार अड्डे प्रकरणी पंचायत मंडळ सक्त
By आप्पा बुवा | Published: April 7, 2023 05:53 PM2023-04-07T17:53:07+5:302023-04-07T17:53:14+5:30
कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे.
फोंडा
कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे.
सरपंच मनूजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर व इतर पंचमंडळाने गुरुवारी सर्व भंगार अड्डय़ाची पाहणी केली. यावेळी सरकारी अधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित होते.
ज्यावेळी पंचायत मंडळाने भंगार अड्डय़ावर पाहणी केली त्यावेळी काही धक्कादायक प्रकार उघडकीस आले. मुख्य म्हणजे काहीच परवानगी न घेता हे निर्माण करण्यात आले आहेत. या भंगार अड्डय़ा ठिकाणीच कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कामगार येथेच जेवण वगैरे करतात .ईथे रिकामी असलेली रासायनिक बॅरल्स तसेच इतर औद्योगिक साहित्य आणले जाते. येथे गॅस सिलेंडर वापरून जेवण करण्यात येत असल्याने एका दिवशी ह्या रासायनिक बॅरल्सच्या संपर्कात येऊन मोठा स्फोट होऊ शकतो. मोठी आग सुध्दा लागू शकते.
सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार सदर भंगारअड्डे प्रकरणी ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. सदर तक्रारीची दखल घेऊनच भंगार अड्ड्यांची पाहणे करण्यात आलेली आहे.त्या म्हणतात इथले जे काही बेकायदेशीर प्रकार आहेत ते यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेला असून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
मागची अनेक वर्षे भंगार अड्डे कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत. सदरची संख्या पंधराच्या वर आहे.वेळोवेळी ग्रामसभेत या विषयावरून बाचाबाची सुद्धा झालेली आहे. असे असतानाही एवढी वर्षे सदर भंगार अड्ड्यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. कुणाच्या आशीर्वादाने हे सर्व चालू होते . असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.