गोवा फॉरवर्ड विलीनीकरणाची शक्यता मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळली

By किशोर कुबल | Published: January 30, 2024 02:48 PM2024-01-30T14:48:58+5:302024-01-30T14:49:59+5:30

खुद्द विजय सरदेसाई यांनीही असे काही नसल्याचे सांगत या गोष्टीचा इन्कार केला आहे.

The possibility of Goa Forward merger was rejected by the Chief Minister, BJP State President | गोवा फॉरवर्ड विलीनीकरणाची शक्यता मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळली

गोवा फॉरवर्ड विलीनीकरणाची शक्यता मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळली

पणजी : गोवा फॉरवर्ड भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये विलीन करण्याच्या कोणत्याही हालचाली नसल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विजय सरदेसाई हे त्यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलीन करू पाहत असल्याचे वृत्त पसरले आहे. 

खुद्द विजय सरदेसाई यांनीही असे काही नसल्याचे सांगत या गोष्टीचा इन्कार केला आहे. ६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगाव येथील जाहीर सभेच्या तयारीसाठी आमदार विजय सरदेसाई यांनीही मोठा हातभार लावला आहे तसेच प्रभू श्री राम प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्तही कार्यक्रमासाठी त्यांना सरकारने सहभागी करून घेतले होते. यामुळे ते भाजपच्या जवळ जात आहेत असेअनेकांना वाटू लागले आहे. 

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना सरदेसाई गोवा फॉरवर्ड भाजपात विलीन करणार आहेत का?, असे विचारले असता ते म्हणाले की, 'पंतप्रधानांचा मडगाव येथील कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम आहे. तो काही भाजपचा कार्य कार्यक्रम नव्हे, ज्या ठिकाणी सभा होणार आहे तो भाग फातोर्डा मतदारसंघात येत असल्याने स्थानिक आमदार म्हणून सरदेसाई यांनी पार्किंगची व्यवस्था व इतर गोष्टींसाठी मदत केलेली आहे. बस स्थानकाजवळ ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, त्यातही सहकार्य केलेले आहे.

तानावडे म्हणाले की, ' सरदेसाई यांच्या भाजप प्रवेशाचा किंवा गोवा फॉरवर्ड विलीनीकरणाचा  कोणताही प्रस्ताव नाही. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कधीही कुणालाही पक्षात प्रवेश दिला जात नाही. हा सरकारी कार्यक्रम आहे एखाद्याला जर पक्षात प्रवेश द्यायचा झाला तर तो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत किंवा स्थानिक अध्यक्षांच्या उपस्थितीत दिला जातो.'

सरदेसाई भाजपात आल्यास किंवा पक्ष विलीन केल्यास त्याचे स्वागत करणार काय, असे विचारले असता जर, तरच्या गोष्टी नकोत. अजून तसा कोणताही प्रस्ताव नाही असे तानावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत फूट पडल्यानंतर सरदेसाई यांनी सावध भूमिका घेतली आहे. काँग्रेसपासून ते अंतर ठेवूनच आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ही अफवा असल्याचे सांगत विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला घेरण्याची आपली रणनीती असल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच या अफवा पसरविल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

Web Title: The possibility of Goa Forward merger was rejected by the Chief Minister, BJP State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा