कळंगुट-कांदोळीत शॅकना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू
By मयुरेश वाटवे | Published: April 3, 2023 04:45 PM2023-04-03T16:45:53+5:302023-04-03T16:46:02+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने न घेताच चालविल्या जाणाऱ्या पर्यटन शॅकवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिला होता.
पणजी - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने न मिळविता कळंगुट- कांदोळी किनाऱ्यावरील पर्यटन शॅकना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रवीण गावस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईत ११३ शॅकना टाळे ठोकले जाणार आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने न घेताच चालविल्या जाणाऱ्या पर्यटन शॅकवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्या आदेशानंतर ४८ शॅक व्यावसायिकांनी मंडळाकडून परवाने घेतले होते. तर राहिलेल्या ११३ व्यावसायिकांनी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने त्यांच्या शॅकना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती गांवस यांनी दिली.आज सोमवारी सकाळी ही कारवाई करण्याची मोहिम सुरू करण्यात आली.
आदेशाचे पालन करण्यासाठी १० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात मामलेदाराचा प्रतिनिधी, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी, पर्यटन खाते, सीआरझेड तसेच इतर संबंधित खात्याच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. कारवाई दरम्यान कोणताच अनुचीत प्रकार घडू नये यासाठी किनाऱ्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.