स्वदेशीवर भर देत नौदलाने केलेली प्रगती नेत्रदिपक; राजनाथ सिंह
By किशोर कुबल | Published: March 5, 2024 02:16 PM2024-03-05T14:16:42+5:302024-03-05T14:16:49+5:30
नौदलाने याबाबतीत केलेली प्रगती लक्षणीय आहे.’ नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.
किशोर कुबल
पणजी : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल झाले असून दुपारी त्यांच्या हस्ते वेरें येथे आयएनएस मांडवी नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की,‘ संरक्षण क्षेत्रात लष्कर, हवाई दल व नौदल स्वदेशी बनावटीवर भर देत असून स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहे. नौदलाने याबाबतीत केलेली प्रगती लक्षणीय आहे.’ नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.
नव्याने बांधलेल्या या इमारतीमुळे संस्थेला लष्करी सेवेतील अधिका-यांना सध्याच्या क्षमतेच्या तिप्पट संख्येने प्रशिक्षित करता येईल. चोल वंशाच्या पराक्रमी सागरी साम्राज्याच्या स्मरणार्थ या इमारतीला ‘चोल’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय नौदलातील मधल्या स्तरावरील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रगत व्यावसायिक लष्करी शिक्षण देण्यासाठी मुंबईत १९८८ मध्ये ‘आयएनएस कारंजा’ येथे नौदल युद्ध महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. २०१० साली महाविद्यालयाचे नाव बदलून नेव्हल वॉर कॉलेज असे करण्यात आले आणि २०११ साली ते गोव्यातील सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
कार्यक्रमाला नेव्हल वॉर कॉलेजच्या माजी कमांडंटसह वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी कारवार येथे सीबर्ड प्रकल्पाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचे उद्घाटन त्यांनी केले.