जनतेने सांगितले तेच केले; श्रीपाद नाईक स्पष्टच बोलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 10:54 AM2024-03-16T10:54:50+5:302024-03-16T10:55:25+5:30
विर्नोडा-भूतवाडी येथे पथदीपांचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : आपले जीवन पूर्णपणे उत्तर गोव्यासाठी आणि पक्षासाठी अर्पित करणार असल्याचे सांगून मंत्री नाईक म्हणाले की, उत्तर गोव्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प उभारताना कसल्याच प्रकारचे राजकारण आणि कसल्याच प्रकारचे धर्माकरण केलं नाही. ज्या नागरिकांनी जनतेने पंचायतीने आपापल्या परिसरात जे जे प्रकल्प उभारावेत, तशा प्रकारची सूचना केली आणि ते प्रकल्प आपण पूर्णत्वाला नेले. याचे मला समाधान वाटते, असे प्रतिपादन उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.
विर्नोडा पंचायत क्षेत्रातील भूतवाडी परिसरात खासदार निधीतून नवीन वीज स्ट्रीट लाइटच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, विर्कोडा सरपंच सुजाता ठाकूर, पंच स्वाती मालपेकर, माजी सरपंच भरत गावडे, माजी सरपंच राव, वीज अभियंता वाटू सावंत, मोपा सरपंच सुबोध महाले व इतर पंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री नाईक म्हणाले की, उड्डाणपुलासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. धारगळ महाखाजण ते पत्रादेवीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आवश्यक असलेली उड्डाणपुले, शिवाय चालण्यासाठी किंवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा प्रयत्न असणार. केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खासदार म्हणून आपल्याला वर्षाकाठी पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होत असतो. त्यातून पूर्ण उत्तर गोव्यात जेवढी गावं येतात त्या प्रत्येक गावामध्ये एक ना एक असा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असतो.
सरपंच सुजाता ठाकूर म्हणाल्या की, विर्नोडा पंचायत क्षेत्रातील काही भागांमध्ये ज्यामध्ये मुख्य रस्ते आहेत, त्यावर अंधार पसरला होता. तो रस्ता प्रकाशमान करण्याचे काम स्ट्रीट लाइट उभारून झाले आहे. धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर यांनी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी राबविलेल्या विकास प्रकल्पांची माहिती दिली.